पुणे : राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द झाल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. मात्र  राज ठाकरेंची सभा पुण्यात होणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात आले आहे. पावसाच्या शक्यतेमुळे सभा पुढच्या आठवड्यात खुल्या मैदानाऐवजी सभागृहात घेण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली आहे. दरम्यान प्रकृती ठीक नसल्यानं राज ठाकरे पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे सभेची तारीख, वेळ आणि ठिकाण राज ठाकरे स्वतः जाहीर करणार आहेत. 


मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर होते. राज ठाकरे हे 21 मे रोजी पुण्यातील नदीपात्राच्या परिसरात सभा घेणार होते. त्यासाठी तयारी सुद्धा सुरु झाली होती, नदीपात्रातील जागेची पाहणी करुन त्याठिकाणी स्वच्छता करण्याचं काम देखील सुरु करण्यात आलं होतं. राज ठाकरे स्वत: दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असतानाच या तारखेची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता अचानक राज ठाकरे मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले. अयोध्या दौऱ्यापूर्वी होणारी ही सभा अत्यंत महत्वाची मानली जात होती. त्यामुळे राज ठाकरेंची सभा नेमकी कधी होणार हा सवाल निर्माण झाला आहे. 


राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौरा करणार आहेत.  राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे. यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.सर्व विरोधानंतरही राज ठाकरे अयोध्येला जाण्यावर ठाम आहेत. मनसेच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांतून मनसे कार्यकर्ते अयोध्येला पाठवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी 11 रेल्वेचे बुकिंग करण्यात येत आहे. राज ठाकरे अयोध्येत पोहोचण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते तेथे पोहोचणार आहेत.