मुंबई : हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात महाआरती होणार आहे. पुण्यातील खालकर मारुती चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे. आधी मुंबई, नंतर ठाणे आणि आता पुण्यात येत्या शनिवारी राजगर्जना होणार आहे. दरम्यान जे पोस्टर मनसेनं बनवलं आहे त्यावर राज ठाकरे यांचा 'हिंदुजननायक' असा उल्लेख करण्यात आला आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, अन्यथा देशभरात हनुमान चालिसा लावणार, या भूमिकेवर राज ठाकरे ठाम आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अवघ्या चार दिवसांत राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात  महाआरती होणार आहे. 




 मनसे अध्यक्ष राज ठाकरे एखादी सभा घेऊन बोलतात आणि गायब होतात असे विधानं शरद पवार यांनी करत मनसेच्या थेट वर्मावर बोट ठेवलं होतं. त्यामुळें हाच गैरसमज खोटा ठरवण्याची तयारी केल्याचे लगेच जाहीर झालेल्या ठाण्याच्या सभेवरून दिसत आहे.  आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे अध्यक्ष आणखी काय बोलतात याविषयी राज्यभरात नक्कीच उत्सुकता आहे.


ठाण्यातील उत्तर सभेतील भाषणात राज ठाकरे मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा, शरद पवार, एसटी आंदोलन अशा अनेक मुद्द्यांवर  टीका केली.  गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात मशिदींवरील भोंग, मदरशांमधील गैरप्रकार याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण चांगलंच तापलेलं आहे. शिवाय त्या भाषणात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता. गुढीपाडवा आणि ठाण्याच्या भाषणात राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास धरल्याचं स्पष्ट झालं आहे. आता या महाआरतीमध्ये राज ठाकरे कोणता मुद्दा मांडणार हे पाहावं लागेल.


 मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं.  3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा. आम्हाला कुठलीही तेढ निर्माण करायची नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते.