यवतमाळ : अनेक कोरोनाबाधित रुग्णांना वेळीच व्हेंटिलेटर न मिळाल्याने जीव गमवावा लागत आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद इथल्या उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दहा व्हेंटिलेटर सात महिन्यांपासून धूळखात पडले असल्याची बाब उघडकीस आली आहे. याबाबत पुसद इथले काँग्रेस नगरसेवक साकीब शाह यांनी व्हेंटिलेटर धूळखात पडले असल्याचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान निधीतून पुसद उपजिल्हा रुग्णालयाला सात महिन्यापूर्वी दहा व्हेंटिलेटर आणि ब्लड स्टोरेज सिस्टीम रुग्णालयाला प्राप्त झाले होते. मात्र मागील अनेक महिन्यांपासून मिळालेली ही यंत्रसामुग्री तशीच धूळखात पडली आहे.
व्हेंटिलेटरअभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला किंवा लागत आहे. अशात जीव वाचवणारी यंत्र सामुग्री धूळखात पडलेली असल्याने ती त्वरित जनसामान्यांच्या उपयोगात आणावी, अशी मागणी पुसदचे नगरसेवक साकीब शहा यांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना ई-मेल पाठवून केली आहे. तसेच या आशयाचे पत्र देखील त्यांनी पंतप्रधान मोदी आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा पत्र पाठवले आहे.
या पुसद उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉ हरिभाऊ फुफाटे यांनी 10 व्हेंटिलेटर सप्टेंबर 2020 मध्ये प्राप्त झाले, असे सांगितले. मात्र व्हेंटिलेटर हाताळण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीच आणि डॉक्टर सुद्धा उपलब्ध नसल्याने त्या व्हेंटिलेटरचे इन्स्टॉलेशन झाले नाही. तसेच यवतमाळ जिल्हा शल्य चिकित्सकांनी 10 पैकी 5 व्हेंटिलेटर यवतमाळसाठी मागितल्याची माहिती दिली.
व्हेंटिलेटर हे कोरोनाच्या गंभीर महामारीत उपयोगात न आणता धूळखात पडल्याचा प्रकार समोर आला आहे तर दुसरीकडे पुसद उपजिल्हा रुग्णालयात कोरोना संक्रमित व्यक्तींकरिता 50 बेडचे आयसोलेशन वार्ड निर्माण केले आहे. याच वार्डमध्ये अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध करुन कोरोना संक्रमित व्यक्तींना लावता आले असते. मात्र सात महिने ते व्हेंटिलेटर तसेच धूळखात वापराविना पडून राहिले आहेत. आता असलेल्या व्हेंटिलेटरसाठी तज्ज्ञ व्यक्ती आणि डॉक्टर केव्हा मिळतील आणि केव्हा ते उपयोगात येतील हा प्रश्न आहे. व्हेंटिलेटर धूळखात पडून असल्याचा प्रकार पुढे आल्यानंतर पुसद उपविभागीय अधिकारी यांनी पुसद उपजिल्हा रुग्णालयात पाहणी केली .