Maharashtra News : ऐन उन्हाळ्यात अंगाची लाही-लाही होण्यापासून सुटका करायची असेल, तर वीजग्राहकांनी स्वत:चे वीजबिल थकबाकीसह भरुन घ्यावं. कारण महावितरण बारामती परिमंडलानं वीजबिल वसुलीसाठी कठोर मोहीम हाती घेतली असून, सरकारी कार्यालयं, घरगुती ग्राहक, शेतीपंपासह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. थकबाकीचा आकडा 5300 कोटींवर गेल्यानं महावितरणचं आर्थिक गणित बिघडलं आहे. दारात लाईनमन येण्यापूर्वी आपलं वीजबिल भरुन गैरसोय टाळावी, असं आवाहन मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी वीजग्राहकांना केलं आहे. 


बारामती परिमंडलात पुण्यातील सहा तालुके तसेच सोलापूर आणि सातारा हे जिल्हे येतात. तब्बल 27 लाख 35 हजार वीज ग्राहकांना सेवा पुरविण्याचं काम बारामती परिमंडल करत आहे. मात्र सधन पट्ट्यालाही थकबाकीचं ग्रहण लागल्यानं महावितरण आर्थिक संकटात सापडली आहे. कृषी वगळता 1213 कोटींची थकबाकी आहे. तर शेतीपंपाची थकबाकी 8 हजार कोटींच्यावर आहे. मात्र, सध्या राज्य शासनाने आणलेल्या कृषी धोरणामुळे शेतकऱ्यांना सप्टेंबर 2020 च्या थकबाकीवर 50 टक्के माफी मिळत आहे. या व्यतिरिक्त दंड, व्याजात सुद्धा माफी दिली आहे. सर्व सवलत गृहीत धरली तर 738288 शेतकऱ्यांना आज रोजी फक्त 4087 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. ही सवलत फक्त 31 मार्चपर्यंतच आहे. शेती आणि बिगर शेती थकबाकी मिळून 5300 कोटी रुपये वसुलीचे उद्दीष्ट बारामती परिमंडलापुढे आहे.


मंडलनिहाय थकबाकी पाहता सोलापूर जिल्ह्यातून शेतीचे 2637 आणि बिगरशेती ग्राहकांचे 616 असे मिळून 3254 कोटी वसूल होणं अपेक्षित आहे. सातारा शेतीचे 336 आणि बिगरशेतीचे 218 असे 554 कोटी तर बारामती मंडलमधून शेतीचे 1112 कोटी आणि बिगरशेतीचे 378 असे मिळून 1491 कोटी वसूली होणं क्रमप्राप्त आहे. बारामती परिमंडल म्हणून 5300 कोटींच्या वसुलीसाठी सर्व त्या उपाययोजना करुन झाल्या आहेत. 


मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या निर्देशानुसार विभाग, उपविभाग आणि अगदी शाखानिहाय पथकं बनविण्यात आली आहेत. ही सर्व पथकं प्रत्यक्ष वसुली मोहीमेत सहभागी होऊन वसूली करणार आहेत. या कामावर मुख्यालयाची बारीक नजर असून, कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याकरिता स्वत: संचालक (संचालन) संजय ताकसांडे हे सुद्धा वसुलीसाठी बारामती परिमंडलाचा 'ऑन द स्पॉट' आढावा घेणार आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha