पंढरपूर : लाखो भक्तांसाठी युगे अठ्ठावीस विटेवर उभा राहिलेल्या सावळ्या विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीवर पुरातत्व वज्रलेप केला जात असतो. आत्तापर्यंत चार वेळा पुरातत्व विभागाकडून मूर्तींवर हे विविध प्रकारच्या रसायनांचे लेपन करण्यात आले होते . मात्र यावेळी केलेला वज्रलेप अत्यंत कमी कालावधीत निघू लागल्याने मंदिर प्रशासनाची चिंता वाढली आहे.
गेले दोन वर्षे असल्याने देवाच्या पायावरील दर्शन पूर्णपणे बंद होते. याच कालावधीत 23 आणि 24 जुलै 2020 या कालावधीत पुरातत्व विभागाने विठ्ठल मूर्तीवर आणि रुक्मिणी मातेच्या पायावर सिलिकॉनचे लेप दिले होते. यानंतर हा लेप पुढील 7 ते 8 वर्षे तसाच राहिल असा दावा करण्यात आला होता. दोन वर्षानंतर 2 एप्रिल 2022 रोजी पुन्हा देवाच्या पायावरील दर्शनास सुरुवात झाली आणि आता हा धक्कादायक प्रकार समोर येऊ लागला आहे.
विठुरायाची वालुकाष्म दगडापासून बनवलेली मूर्ती असून नाही घडविला नाही बैसविला अशी स्वयंभू असल्याचे वारकरी संप्रदायाचे मानणे आहे. या मूर्तीवर पूर्वी होणाऱ्या वारंवार पंचामृताचा अभिषेकाने मूर्तीची झिज होत असल्याचे वास्तव 'माझा' ने दाखविल्यानंतर देवावरील हे अभिषेक बंद करण्यात आले होते. मात्र तरीही मूर्तीची झीज होत असल्याने तिच्यावर आत्तापर्यंत चार वेळा वज्रलेप करण्यात आले होते . रुक्मिणी मातेची मूर्ती ही गंडकी पाषाण म्हणजेच शाळीग्राम दगडाची असून ती अतिशय गुळगुळीत आहे. मात्र या मूर्तीच्या पायाची झीज मोठ्या प्रमाणात होत असल्याने या पायावर दरवेळी वज्रलेप केला जात असतो. आता पायावर दर्शन सुरु होऊन केवळ आठच दिवस झाले असताना रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेपाचे तुकडे पडल्याने पायाची दुरावस्था झाली आहे . आता इतक्या कमी वेळात दर्शन बंद असताना या दोन्ही मूर्तींची झीज कशामुळे झाली याचा पुरातत्व विभागाला अभ्यास करावा लागणार असून ही झीज रोखण्याचे मोठे आव्हान आता पुरातत्व विभागासमोर उभे राहिले आहे.
विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची वज्रलेपानंतर अल्पावधीतच झीज सुरु झाल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी मान्य केले असून तातडीने पुरातत्व विभागाशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी माझाशी बोलताना सांगितले. आता दोन वर्षातच मूर्तीची झीज सुरु झाल्याने पुरातत्व विभागाने त्यांच्या तज्ञ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील प्रक्रिया करणे गरजेचे आहे. एका बाजूला विठ्ठल मंदिराला 76 कोटी रुपये खर्चून पुरातन रूप देण्याच्या कामास सुरुवात होणार असताना मंदिरातील मूर्तींचे संवर्धनासाठी याआधी मोठी पावले उचलावी लागणार आहेत. विठ्ठल रुक्मिणी हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून पुढच्या पिढीला देवाचे हे मूळ रूप पाहता यावे यासाठी वारकरी संप्रदाय नेहमीच आग्रही असताना आता शासनानेही यात लक्ष घालून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत मूर्ती संवर्धन साठी प्रयत्न करण्याची मागणी भाविकांतून होत आहे.
शेवटचे लेपन असे झाले होते...
23 जुलै 2020 रोजी दुपारी एक वाजता पुरातत्व विभागाचे उपाधिक्षक आणि रसायनशास्त्र तज्ज्ञ श्रीकांत वर्मा यांच्या टीमने गाभाऱ्यात सोवळे नेसून कामाला सुरुवात केली होती. पहिले पाच तास डिटर्जंट सारख्या सौम्य रसायनाने मूर्ती बारकाईने साफ करून घेतली होती. यानंतर ज्या वालुकाशम दगडाची ही मूर्ती आहे त्याच पद्धतीच्या दगडाची पावडर एका रसायनात मिसळून जिथे खड्डे पडले आहेत किंवा जिथला भाग झिजला आहे अशा जागी ती भरण्यात आली होती. विठुरायाच्या पायाची दर्शनामुळे मोठी झीज झाली होती. या ठिकाणी तसेच मुकुट बसवायची कपाळावरची जागा व इतर ठिकाणी हे मिश्रण भरून रात्रभर तसेच ठेवण्यात आले .
24 जुलै 2020 रोजी सकाळी नऊ वाजता खऱ्या अर्थाने मूर्तीवर लेपन अर्थात वज्रलेपास सुरुवात करण्यात आली होती. सिलिकॉन रेझीन आणि एक रंगहीन रसायनाचे मिश्रण करून ब्रशच्या मदतीने विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर याचे लेपन करण्यात आले. याला हायड्रोफोबिक कॅरेक्टरचा लेप असेही म्हणाले जाते. या पातळ फिल्म सारख्या लेपामुळे मूर्तीवर पाण्याचे शोषण होत नसून उलट मूर्तीमधील पाणी बाहेर येते असे सांगितले जाते. ही मूर्तीवरील पातळ फिल्म काही दिवसात मूर्तीमध्ये एकरूप होऊन जाते आणि पुढे 5 ते 8 वर्षे ती मूर्तीवर राहते असे सांगण्यात आले होते . 24 जुलै 2020 रोजी दुपारी दोन वाजता ही प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि 25 जुलै 2020 रोजी मूर्तीवर कोणतेही नित्योपचार केले गेले नाहीत. 26 जुलै 2020 पासून मूर्तीवर नियमितपणे नित्योपचार करण्यास सुरुवात झाली होती. 2020 च्या आषाढीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा या लेपन झालेल्या मूर्तीवर करण्यात आली होती .