सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणारे भिडे यांच्यावर एका मुस्लीम डॉक्टराने उपचार केले आहेत. भिडे यांच्यावर उपचारासाठी थांबणे कर्तव्य आहे असे समजून या डॉक्टरने आपला पुरस्कार सोहळाही रद्द केला. या  मुद्यावरून सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरू आहे. मात्र आता उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी पोस्ट करत कोणीही या विषयाला धार्मिक रंग देऊ नये असे  स्पष्टीकरण दिले आहे. 


संभाजीराव भिडे यांचा 27 एप्रिल रोजी सांगलीत सायकलीवरून जाताना पडल्याने त्यांच्या खुब्याला मार लागल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. भिडेवर उपचार करण्यासाठी भारती हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले. त्यांच्या उपचाराची जबाबदारी देखील सर्वात तज्ज्ञ डॉक्टरांना देण्यात आली. शस्त्रक्रियाच्या अगोदर काही तपासणी आणि ह्रदयाच्या तपासणी करणे गरजेचे होते. या उपचाराची जबाबदारी मिरज मधील कार्डियलॉजिस्ट डॉ. रियाज मुजावर यांना भारती हॉस्पिटलकडून  देण्यात आली. मुजावर यांनी स्वतःच्या एका पुरस्कार सोहळ्याला जाण्याचे  टाळून ही जबाबदारी त्यांनी पार पाडल्याचे सोशल मीडियावर पोस्ट पडू लागल्या.


रियाज मुजावर यांना नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्ड पुरस्कार मुंबई सहारा स्टार हॉटेल या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज व अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत मिळणार होता.  परंतु शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांचा अपघात झाला व त्यांच्या ऑपरेशन पूर्व तपासणीची जबाबदारी देण्यात आली.  डॉ. रियाज मुजावर यांनी पुरस्कार सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेऊन संभाजी भिडे गुरुजी यांच्या तब्येतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर पडल्या होत्या. मात्र या पोस्टवर डॉ. रियाज मुजावर यांनी स्पष्टीकरण देत आपण आपली जबाबदारी पार पाडल्याचे सांगत कुणीही या विषयाला धार्मिक रंग देऊ नये असे म्हटले आहे.


डॉक्टरांनी केलेली पोस्ट


मी डॉ. रियाज उमर मुजावर (हृदयरोगतज्ज्ञ)स आपणास सांगू इच्छितो की, मला दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी माननीय संभाजी भिडे गुरुजी यांच्या ऑपरेशनच्या पूर्व तपासणीसाठी बोलावले गेले. 28 एप्रिल 2022 रोजी सकाळी त्यांचे ऑपरेशन ऑर्थोपेडीक डिपार्टमेंट भारती हॉस्पिटल सांगलीमध्ये झाले असून पुढील 48 तास गुरुजींना कार्डिओलॉजी युनिटमध्ये अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आले. माझ्यावर असलेल्या नैतिक जबाबदारीमुळे मी 28 व 29 एप्रिल 2022 रोजी मिरजमध्ये राहणे योग्य समजले. कृपया या घटनेचा कुणीही धर्म, जाती व इतर राजकीय कारणास्तव वापर करू नये. ही नम्र विनंती.