मुंबई :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 


लवकरात लवकर  कडक कारवाई करण्याची मागणी


शरद पवारांना मिळालेल्या धमकीचा सखोल तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे.  मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याच्या गृहमंत्री जबाबदार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल करत  कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.


राजकारण महाराष्ट्राचे या ट्विटर हँडलवरून आली धमकी


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राजकारण महाराष्ट्राचे असं या ट्विटर हँडलचं नाव आहे. हे हँडल कुठली व्यक्ती चालवते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याचबाबत सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली, आणि सखोल तपास करण्याची मागणी केली. राज्यात सध्या दडपशाही आणि गुंडगिरी सुरू आहे.


राज्याच्या गुप्तचर खात्याचं अपयश 


गेल्या काही दिवसापासून ज्या घटना घडत आहे, ते राज्याच्या गुप्तचर खात्याचं अपयश आहे. या घटना कशा घडतात. एवढा द्वेष कुठून येतो? असा सवाल  उपस्थित केला आहे. मीरा रोड हत्येप्रकरणी देखील सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. महिलांबाबत सातत्याने घटना घडत आहे. हे गृहखात्याचं हे अपयश आहे. बेटी बचाव बेटी पढाव म्हणतात आणि या घटना कशा घडतात असा सवाल उपस्थित केला आहे. 


पवारांना आलेल्या धमकी प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया


पवारांना आलेल्या धमकीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना  जर कोणी अशी धमकी दिली असेल तर पोलिसांनी त्वरित कारवाई करून अटक करावी असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


काय म्हणाले होते शरद पवार?


शरद पवार यांनी कोल्हापुरमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर प्रतिक्रिया दिली होती.  "कोल्हापूरमध्ये जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही.  कुणीतरी काहीतरी करुन, जाणीवपूर्वक वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्यालाही माझा आक्षेप आहे. याची किंमत सामान्य माणसाला मोजावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी हे घडणार नाही याची काळजी घ्या. शासकीय यंत्रणेला सर्वसामान्य लोकांनी मनापासून सहकार्य करण्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी या यंत्रणेला सहकार्य केलं तर ही अवस्था तातडीने बंद झालेली दिसून येईल. कोल्हापूरला सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामान्य माणसांच्या हिताची जपणूक केली पाहिजे."