मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीच आयोजन - 
भोंग्यासंदर्भात अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीच आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. मनसेकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे सहभागी होणार आहेत. भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या बैठकीला हजर राहणार आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा राज्य सरकारला मनसेने दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गृह विभागाने तात्काळ सर्वपक्षीय बैठक आमंत्रित केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. सर्व पक्षांचे दोन प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भोंग्याबाबत राज्य सरकारकडून सर्वच प्रार्थनास्थळांसाठी लवकरच मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार आहेत. मार्गदर्शक सुचना जाहीर करण्याच्या आगोदर गृहविभागाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.  


किरीट सोमय्या सोमवारी केंद्रीय गृहमंत्र्यांची घेणार भेट -
शनिवारी झालेल्या घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या सामोवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहोत. यावेळी त्यांच्यासोबत भाजप आमदार मंगल प्रभात लोढा, मिहीर कोटेचा, आशिष शेलार आणि मनोज कोटक हे महत्वाचे नेते देखील उपस्थित असणार आहे.


16 शिवसैनिकांना कोर्टासमोर हजर केलं जाणार
नवनीत राणांच्य़ा घराबाहेर आंदोलन करणाऱ्या 16 शिवसैनिकांना आतापर्यंत पोलिसांकडून अटक केली आहे. आज सर्वांना कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. 


बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारतीचे लोकार्पण - 
महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारतीचे लोकार्पण.  राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते. वेळ-  ३ वाजता .स्थळ- विलेपार्ले (पश्चिम) कूपर रुग्णालय परिसर 


योगींच्या शपथविधीला महिना -
योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्याला आज एक महिना झाला. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एक महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. 


पंजाबचे मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर – 
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. दिल्लीतील शाळा आणि क्लिनिक मोहल्ला याची पाहणी करणार आहेत. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उपस्थित राहतील. भगवंत मान दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. 


दिल्ली- सुप्रीम कोर्टात कोणत्या प्रकरणावर सुनावणी ?
दिल्लीतील सरोजिनी नगर परिसरातील झोपडपट्या हटवल्याच्या प्रकरणावर दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. याचिका कर्त्याने असे म्हटलेय की, 1980 पासून येथे राहणाऱ्या 200 कुटुंबांना रस्त्यावर आणले आहे. अचानक झोपडपट्टया हटवल्यामुळे सर्वजण रस्त्यावर आले.  


पाठ्यपुस्तकात क्रीडा हा विषय अनिवार्य करावा, अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्टाने या प्रकरणात केंद्र आणि सर्व राज्य, NCERT आणि UGC ला उत्तर मागितले आहे. 


पंजाबमध्ये ड्रग्सविरोधोती अभियान -
पंजाबमधील खटकर कलां येथून आजपासून ड्रग्सविरोधीत जागरुकता अभियान सुरु होणार आहे.  पंजाब पोलिस आणि प्रशासनाने हे अभियान राबवले आहे. या अभियानादरम्यान नागरिकांसोबत अधिकारी चर्चा करणार आहेत.


"योग प्रभा" कार्यक्रमाचे आयोजन -
नागरी उड्डान मंत्रालयामार्फत आज "योग प्रभा" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी वी.के. सिंहही उपस्थित राहणार आहेत. 


'अभिनव कृषी'वर एक दिवसाची कार्यशाळा – 
निती आयोगाद्वारे आजपासून 'अभिनव कृषी' कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि परुषोत्तम रूपाला, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार उपस्थितांना संबोधित करणार आहेत. सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत ही कार्यशाळा सुरु राहणार आहे. 


27 वा कोलकाता चित्रपट महोत्सवाची सुरुवात – 
आजपासून 27 व्या कोलकाता चित्रपच महोत्सवाला सुरुवात होणार आहे. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजीत रे यांचा  ‘अरण्येर दिन रात्रि’ या चित्रपटाने महोत्सवाला सुरुवात होणार आहे.  40 देशांचे तब्बल 163 चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले नव्हते. पण आता कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर आयोजन करण्यात आलेय.  
 
दूरदर्शनचे रंगीत प्रसारण -
दूरदर्शनच्या इतिहासात 25 एप्रिल हा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण 1982 चा हा तोच दिवस होता, जेव्हा दूरदर्शनने पहिल्यांदा रंगीत  प्रसारणाची चाचणी सुरू केली होती.


जागतिक मलेरिया दिन -
हिवताप या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जगभरामध्ये जागतिक हिवताप दिवस म्हणून साजरा केला जातो. हिवतापाच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक पातळीवर विविध उपक्रम केले जातात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2008 मध्ये सर्वप्रथम हा दिवस साजरा केला. त्यापूर्वी 25 एप्रिल हा दिवस केवळ ‘आफ्रिकन हिवताप दिवस’ म्हणून ओळखला जात असे. 


PBKS vs CSK : चेन्नई आणि पंजाबच्या ‘किंग्स’मध्ये टक्कर,  हेड टू हेड आकडे 
IPL 2022 News : पंजाब किंग्स (PBKS) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यामध्ये सोमवारी टक्कर होणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगमातील हा 38 वा सामना असणार आहे. दोन्ही संघाची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. पंजाबने आयपीएलमध्ये चांगली सुरुवात केली होती, मात्र कामगिरीत सातत्य राखता आले नाही. मयांक अग्रवालच्या नेतृत्वात पंजाब संघाने सात सामन्यात तीन विजय मिळवलेत तर चार पराभवाचा सामना केलाय. दुसरीकडे लागोपाठ पराभव मिळाल्यानंतर धोनीच्या फिनिशिंग टचमुळे चेन्नईची गाडी विजयाच्या पटरीवर परतली आहे. चेन्नईने सात सामन्यात दोन विजय मिळवले आहेत. प्ले ऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघाला विजय आवशक आहे.