Nashik Crime : ग्रामीण भागात आजही जमिनीच्या वादातून (Land Records) सख्खा भाऊ पक्का वैरी असल्याचे चित्र अनेक घटनांमधून दिसून येते. अनेकदा जमिनीच्या वादातून मारहाण, खून (Murder) झाल्याच्या घटना देखील ऐकायला मिळतात. नाशिक जिल्ह्यात असाच काहीसा प्रकार घडला आहे. रस्ता दाखवण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar) तालुक्यातील वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीत (Vavi Police Station) ही घटना घडली आहे. शेतातील गहू काढण्यासाठी हार्वेस्टर मशिन नेण्यासाठी रस्ता दाखविण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत जखमी इालेल्या अंकुश यादव आंधळे या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. खंबाळे (Khambale) गावाच्या शिवारातील पिंपळाचा मळा भागातील समृद्धी महामार्गालगत बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी संशयित आजोबा आणि नातवाविरोधात वावी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अंकुशला मारहाण करताना एका संशयिताने अंकुशची आई कांताबाई आंधळे यांचे हात पकडून रोखून धरले होते. त्यामुळे आपल्या डोळ्यांसमोरच मुलाचा बेदम मारहणीत मृत्यू झाल्याचा प्रसंग पाहण्याची दुर्दैवी वेळ पन्नासवर्षीय आईवर ओढावली.
कांताबाई आंधळे यांनी वावी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रामचंद्र नाना दराडे आणि मारुती बस्तीराम दराडे या आजोबा आणि नातवाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. मृत अंकुशच्या शेताशेजारी नामदेव दराडे यांचे शेत असून, दोघांच्याही शेतातून समृद्धी महामार्ग गेलेला आहे. बुधवारी सायंकाळी मारुती त्याच्या शेतातील गहू काढण्यासाठी हार्वेस्टर मशिन घेऊन आला. त्याने अंकुशला मशिन घेऊन जाण्यासाठी रस्त्याबाबत विचारणा केली. मशिन थोडे खालून नेता येईल, असे अंकुशने सांगितल्यावर मारुतीने अंकुशसोबत वाद घातला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. रामचंद्र दराडेंनी अंकुशच्या आईला पकडून ठेवले, मारुतीने त्याला बेदम मारहाण केली. अंकुशचे वडील यादव आंधळे, शेजारी बबन आंधळे मदतीला आल्याचे बघून दोघांनी पोबारा केला. अंकुशला आईवडिलांनी दोडी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
रस्ता दाखविण्याच्या वादातून घडली घटना
अंकुश हा त्याच्या घरासमोर असताना तेथुन संशयित गहु कापण्याचे हार्वेस्टर मशिन घेवुन जात होता. यावेळी अंकुश संशयिताला म्हणाला कि, खालुन मशिन जावु दे तिकडून मशिन नेता येईल, असे बोलला. त्यानंतर संशयित अंकुश यास म्हणाला कि, मला रस्ता दाखव असे बोलुन पुढे निघुन गेला. तेव्हा अंकुश हा देखील त्याचे पाठीमागे शेतात गेला असता यातील संशयिताने अंकुश यास मारहाण करण्यास सुरवात केली. काही वेळात दुसऱ्या संशयिताने आई कांताबाई चे यांचे हात पकडून ठेवले. या मारहाणीत अंकुश हा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.