Nashik Free style : शाळा-महाविद्यालयात मुला-मुलींच्या हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर (social Media) चांगलेच व्हायरल होत असतात. नाशिक शहरात देखील अनेकदा महाविद्यालयातील तरुणींच्या हाणामारीचे (Free Style) व्हिडीओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. आता परीक्षेच्या दिवशीच शहरातील सातपूर भागातील मुलींच्या हाणामारीची घटना समोर आली आहे. 


काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) शहरातील एका महाविद्यालयातील तरुणीच्या हाणामारीचा व्हिडीओ (viral Video) तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता शाळेतील विद्यार्थिनींचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दहावीच्या पेपरच्या (SSC Exam) दिवशी हा प्रकार घडला आहे. सातपूर भागातील एका विद्यालयात दहावीचा पेपर सुरु होता. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांची घरी जायची लगबग होती. अशातच भर रस्त्यात काही विद्यार्थिनींनी एका विद्यार्थिनीला जोरदार चोप दिला आहे. सहा ते सात विद्यार्थिनी एका विद्यार्थिनीला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. 


नाशिक शहरातील सातपूर परिसरात असलेल्या एका विद्यालयात दहावीचा पेपर देण्यासाठी शहरातून अनेक विद्यार्थी गेले होते. दुपारी पेपर सुटल्यानंतर काही विद्यार्थिनींनी दुसऱ्या एका विद्यार्थिनीला मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी विद्यार्थिनींनी हातातील पॅडद्वारे मारहाण करत असल्याचे व्हिडीओतून दिसते आहे. यावेळी पेपर नुकताच सुटला असल्याने अनेक विद्यार्थ्यांसह आजूबाजूच्या नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान भर रस्त्यात या तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे दिसून येत आहे, मात्र भाडंण नेमके कशावरून झाले हे काही समजू शकले नाही. 


दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओत सहा-सात विद्यार्थिनींचा ग्रुप हा एका दुसऱ्या विद्यार्थिनीला मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे विद्यार्थी, नागरिकांची प्रचंड गर्दीही पाहायला मिळत आहे. मात्र कोणीच सोडवायला जाताना दिसत नाही. शेवटच्या क्षणी एक वयस्क माणूस हा भांडण सोडविण्यासाठी जात असल्याचे दिसत आहे. परंतु हा वाद नेमका काय आहे? आणि या तरुणी कुठल्या कारणातून भांडत आहेत? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.


नाशिकमध्ये चर्चेचा विषय 


दरम्यान नाशिक शहरात यापूर्वी देखील तीन चार वेळा महाविद्यालयीन तरुणींमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सातपूर परिसरातील घटनेत हाणामारी करणाऱ्या तरुणींमध्ये किरकोळ कारणाहून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. कॉलेज तरुणांमध्ये अनेक वेळा वाद होत असतात त्यातून हाणामारी होत असते. परंतु आता कॉलेज तरुणींमध्ये देखील हाणामारी होत असल्याने नाशिकमध्ये सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ सार्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे.