Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरासह मालेगाव (Malegaon) येथे खुनाची (Murder) घटना उघडकीस आली असून दोन जणांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील म्हसरूळ (Mhasrul) परिसरात वॉचमॅनचा तर मालेगाव शहरात एका अल्पवयीन तरुणाला जीवे ठार मारण्यात आल्याची घटना घडली आहे. म्हसरूळसह मालेगावातील रमजानपुरा परिसरात खळबळ उडाली आहे. 


नाशिकसह जिल्ह्यात गुन्हेगारी फोफावत चालली असून दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांना ऊत आला आहे. मारहाण, घरफोडी, चोरी या घटना नित्याच्या झाल्या असून यावर पोलिसांचा अंकुश नसल्याने गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. त्यामुळे मात्र नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आज जिल्ह्यात दोन खुनाच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. यामध्ये बहिणीकडे वाईट नजरेने बघितले म्हणून म्हसरूळ (Mhasrul) परिसरातील एका बांधकामाच्या साइटवर वॉचमन आणि बिगारी यांच्यात झालेल्या हाणामारीत वॉचमनचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर दुसऱ्या घटनेत मालेगाव शहरात मागील भांडणाचा वचपा काढण्यासाठी दोन मित्रांनी मिळून तिसऱ्याचा काटा काढला आहे. 


नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील घटना अशी कि, संशयित योगेश पंढरीनाथ डंबाळे हा म्हसरूळ परिसरातील वाढणे कॉलनीतील हनुमान मंदिराजवळील एका बांधकाम साइटवर बिगारी म्हणून काम करत होता. या साइटवर सतलाल मुकूरी प्रसाद वॉचमन म्हणून काम करत होते. दरम्यान काल रात्रीच्या वेळी बिगारी योगेश डंबाळे हा दारू पिऊन येऊन सतलाल याला माझ्या बहिणीकडे वाईट नजरेने का बघतो ? असा सवाल करत त्याने सतलालच्या तोंडावर जोरदार फटका मारला. या हाणामारीत सतलाल खाली पडून त्याच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर तो घरी जाऊन झोपला असता सकाळी त्याला बघितल्यावर तो मृत अवस्थेत आढळला. यावरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात योगेश डंबाळे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


तर दुसरी घटना मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस  स्थानकाच्या हद्दीत मागील भांडणाची कुरापत काढून दोघा तरुणांनी सतरा वर्षाच्या समीर असलम शहा सुलेमान शहा याला चाकूने भोसकून त्याचा खून केलेली धक्कादायक घटना घडली. समीरच्या घरातील सगळे लोक बाहेरगावी गेलेले असताना तो घरी एकटाच होता. त्याचवेळी मागील भांडणाची कुरापत काढत दोघे अल्पवयीन तरुणांनी त्याला पकडून त्याच्यावर चाकूने वार केले. त्यास उपचारासाठी नदीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रक्तस्त्राव अधिक झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रमजान पुरा पोलिसात पूर्ण दाखल करण्यात आला आहे.


वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश कधी?
वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिककर सध्या भयभीत आहेत. प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली. टोळकेच्या टोळके सर्रासपणे हातात चॉपर, कोयते घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. खरं तर धार्मिक आणि शांत म्हणून नाशिक शहराची ओळख मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटना बघता हिच नाशिकची ओळख बदलणार तर नाही ना अशी भिती व्यक्त केली जातीय. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच राहीला नसल्याने नाशिककर सध्या भयभीत आहेत.