Nashik News : उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक (Nashik) ग्रंथोत्सव 2022 चे (Book Festival) आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शहरातील औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय (Sarvajanik Vachanalay) येथे करण्यात आले. 


दरवर्षीं आयोजित केला जाणारा ग्रंथोत्सव यंदा ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथदिंडी, कवि संमेलन, मान्यवरांची व्याख्याने, मनशक्ती संगीत अशा विविध कार्यक्रम ग्रंथप्रेमी व वाचक यांना अनुभवयास मिळणार आहे. तसेच विविध ग्रंथ व साहित्य प्रदर्शन व विक्री या दोनही दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. ग्रंथोत्सवास शहरातील नागरिक व ग्रंथप्रेमी यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी  यांनी केले आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 9.00 वाजता ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. ग्रंथदिंडीची सुरूवात सार्वजनिक वाचनालय टिळकपथ येथून रेडक्रॉस सिग्नल, धुमाळ पॉईंट, चांदीचा गणपती, मेन रोड, मुंदडा मार्केट मार्गे सार्वजनिक वाचनालय येथे संपन्न होणार आहे. ग्रंथ दिंडीत शाळा, महाविद्यालये, अधिकारी, कर्मचारी व ग्रंथप्रेमी वाचक सहभागी होणार आहे.


दरम्यान ग्रंथोत्सवाचा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 10.00 वाजता मु. श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचलनाय येथे ग्रंथोत्सव 2022 चा उद्घाटन सोहळा संपन्न झाले. त्याचबरोबर विजयकुमार मिठे यांच्या उपस्थितीत दुपारी ग्रंथोत्सवस्थळी निमंत्रित कवींचे संमेलन होणार आहे. तर ग्रंथोत्सवाचा दुसऱ्या दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत वाचन संस्कृती व ग्रंथांचे महत्व या विषयांवर डॉ. शंकर बोऱ्हाडे व डॉ. दिलिप धोंगडे  यांच्या व्याख्यानाचे आयेाजन करण्यात आले आहे.


दोन दिवशीय ग्रंथोत्सवात संगीताचा कार्यक्रम देखील आयोजित केला आहे. यावेळी गायक व संगीतकार संजय गिते हे दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत  व्यक्ती विकास, तणाव मुक्तीसाठी  मनशक्ती संगीत कार्यक्रम सादर करणार आहेत. या ग्रंथोत्सवाचा समारोप सायंकाळी 5.00 वाजता आयोजित केला असून, समारोप  कार्यक्रमास जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, उपसंचालक तथा वरिष्ठ कोषागार अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी उपस्थित राहणार आहेत.