Nashik Bakari Eid : उद्या (29 जून) गुरुवार रोजी बकरी ईद असल्यामुळे नाशिक शहरातील (Nashik) मध्यवर्ती भागात असलेल्या इदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांची मोठी गर्दी होते. यादिवशी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार दोन मार्ग या कालावधीत बंद राहतील, तर इतर पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली जाणार आहे.


इस्लामी संस्कृतीचा सण ईद-उल-अझा अर्थात बकरी ईद (Bakari Eid) गुरुवारी शहर तसेच जिल्ह्यात सर्वत्र साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सामुदायिक नमाज पठणाचा सोहळा पारंपारिक पद्धतीने शहाजहान ईदगाह मैदानावर (Shahajahan Eidgah Maidan) सकाळी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी यासंदर्भातील अधिसूचना काढली आहे. दि. 29 रोजी बकरी ईद असल्याने इदगाह मैदानावर मुस्लीमबांधव नमाज पठण करण्यासाठी एकत्र येतात. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. 


सद्यस्थितीत पाऊस सुरु असल्याने इदगाह मैदानावर काही प्रमाणात चिखल आहे. महापालिकेकडून यावर रोलरच्या माध्यमातून सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नमाज पठणासाठी येताना बांधवांनी रेनकोट, छत्री तसेच पावसाच्या पाण्यात ओले होणार नाही, अशा प्रकारचे साहित्य सोबत आणावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. नमाज पठणाचा मुख्य सोहळा नियोजित वेळेच्या काही मिनिटे अगोदर होणार आहे. बकरी ईद निमित्त गुरुवारी सकाळी पारंपारिक पद्धतीने जुन्या नाशिकसह सिडको, सातपूर, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली गाव, भगूर आदी उपनगरीय भागांमधील मशिदींमध्ये ही नमाज पठणाचे नियोजन करण्यात आले आहे.


असा आहे वाहतुकीत बदल



  • त्र्यंबक पोलीस चौकी ते मायको सर्कलपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी जाण्या-येण्यास बंद करण्यात येणार आहे.

  • याबरोबरच गडकरी चौक ते मोडक सिग्नलपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंद राहणार आहे.

  • मोडक सिग्नलपासून त्र्यंबक रस्त्याने जाणारी वाहतूक सीबीएस, अशोकस्तंभ, गंगापूरनाका सिग्नल ते जुना सिबीएस सिग्नलमार्गे जातील किंवा मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, संदीप हॉटेल, चांडक सर्कल मायको सर्कलमार्गे जुना सीबीएस सिग्नलमार्गे त्र्यंबककड़े जातील.

  • मायको सर्कलकडून मोडक सिग्नलकडे येणारी वाहतूक ही मायको सर्कलकडून चांडक सर्कल, संदीप हॉटेल, गडकरी चौकमार्गे इतरत्र जातील किंवा जुना सिटीबी सिग्नल, एचडीएसी सर्कल, कॅनडा कॉर्नर, गंगापूर रोडमार्गे जातील.


हेही वाचा


Nashik Eid Mubarak : नाशिकच्या शहाजहाँन ईदगाह मैदानावर 'ईद मुबारक', वीस हजार बांधवांचं सामूहिक नमाज पठण