Nashik Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) स्वातंत्र्यवीर सावरकर (Sawarkar) यांच्यावर केलेल्या टीकेचे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये (Nashik) देखील शिंदे गटाचं  (Shinde Sena) शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 


सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र (Maharashtra) फिरत आहेत. अशातच राहुल गांधी यांनी मंगळवारी वाशिम (Washim) येथे भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या सभेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्याचं आरोप करण्यात येत आहे. यामुळे भाजप शिंदे गटाकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. दुसरीकडे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी भारत जोडो यात्रा थांबविण्याची मागणी देखील केली आहे. त्यामुळे राज्यभरात राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे (Pravin Tidme) यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांसह महिला वर्ग आंदोलनांत सहभागी होता. 


यावेळी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय राहुल गांधींच्या पोस्टरला जोडा मारो आंदोलन करण्यात आले. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी प्रवीण तिदमे म्हणाले कि, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हेच विचार बाळासाहेबांची शिवसेना वतीने जाहीर निषेध केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे हा निषेध केला जात आहे. बाळासाहेबांनी दाखविलेल्या सत्याच्या वाटेवर चालत आहोत, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे राहुल गांधींना जाऊन गळाभेट घेत आहेत, हे कुठेतरी चुकीचे आहे. आम्ही जरी बाळासाहेबांच्या रक्ताच्या नात्याचे वारसदार नसू तरी आम्ही विचारांचे वारसदार आहोत, त्यामुळे राहुल गांधींनी चुकीचे वक्तव्य केले असून शिंदे गटाकडून निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरल्याचे ते म्हणाले. 


आदित्य ठाकरेंची गळाभेट 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) राज्यातील हिंगोली जिल्ह्यात प्रवेश झाला. त्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यात्रेत सहभाग घेत राहुल गांधींची गळाभेट घेतली. यानंतर राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अपशब्द काढले. यावरून शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात करण्यात आहे. एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांची आदित्य ठाकरे यांनी गळाभेट घेतली. हिंदुत्वाचे विचार आता कुठे गेले? असा सवाल शिंदे गटाच्या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. 


काय म्हणाले होते, राहुल गांधी? 
एकीकडे देशासाठी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.