Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील अद्यापही अनेक भागात पावसाळ्यात (Rain) झालेली रस्त्यांची अवस्था जैसे थे असून नाशिककरांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशातच नाशिक पेठ रस्त्यावर नागरिकांच्या वतीने रास्ता रोको (Protest) आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात नागरिक रस्त्यावर येऊन नाशिक पेठ (Nashik Peth Highway) महामार्ग रोखून धरला. तासाभराच्या आंदोलनानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यंदाच्या पावसाळ्यात नाशिक शहरातील रस्ते खड्डेमय झाल्याचे पाहायला मिळाले. काही भागात रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे, तर अनेक भागात अद्यापही रस्त्यांची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकरांनी या पूर्वी देखील अनेकदा आंदोलने केली आहेत. मात्र सद्यस्थितीत मनपाकडून कामकाज सुरु असल्याने अनेक रस्ते ठीक झाले आहेत. मात्र नाशिकच्या पेठ रोड भागात आजही रस्त्यांवरील खड्ड्यांनि नागरिक हैराण झाले आहेत. खड्डे आणि धुळीच्या त्रासाला कंटाळून नाशिकमध्ये पेठ रोडवर संतप्त स्थानिक नागरिकांनी आज सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात पुरुषांसोबतच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
नाशिक शहरात पेठरोडवर तवली फाटा, राऊ हॉटेल जवळ 3-4 किलोमीटर रस्त्यावर अनेक महिन्यांपासून भले मोठे खड्डे पडले असून वाहनचालक तसेच स्थानिक नागरीकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. पेठरोडवर जवळपास अडीच किलोमीटर रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झाली असून रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे स्थानिक नागरिकांचा रास्ता रोको करण्यात आला. तसेच वारंवार निवेदने देऊन देखिल प्रशासन तसेच माजी नगरसेवक याकडे दूर्लक्ष करत असल्याने नागरिक संतप्त झाले असून या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या आंदोलनावेळी कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
नाशिक पेठ रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येऊन प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यावेळी गुजरातला जोडणाऱ्या मुख्य मार्ग नाशिक पेठ रोडवर वाहतूक खोळंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत निदर्शने केली. त्यामुळे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलन दरम्यान स्थानिक नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. यावेळी पेठ रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या चित्र होते. तर रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.