CIDKO Office : सिडकोचे (CIDCO) कार्यालय नाशिकमध्येच (Nashik) राहणार असून याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. त्यामुळे सिडकोचे नाशिक कार्यालय पूर्ववत होणार अशी माहिती शिंदे गटाचे शहराध्यक्ष प्रवीण तिदमे (Pravin Tidme) यांनी दिली आहे. नाशिक शहरातून सिडकोचे कार्यालय औरंगाबाद येथे हलविण्याचे निर्देश दिले, नाशिक जिल्ह्यातील प्रतिनिधींकडून यास विरोध करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मागे घेतल्याचे समजते.
दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने नाशिकचे सिडको कार्यालय हलविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला. सिडकोने ‘लिज होल्डने’ दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ करून घरधारकांना संपूर्ण मालकी मिळेपर्यंत सिडको प्रशासकीय कार्यालय सुरूच ठेवण्याची मागणी लोकप्रतिनिधीकडून करण्यात आली होती. त्याचबरोबर शिंदे गटाचे नाशिक शहराध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घरधारकांना संपूर्ण मालकी मिळेपर्यंत सिडको प्रशासकीय कार्यालय सुरूच ठेवण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले आहेत.
दरम्यान रविवारी प्रवीण तिदमे यांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदने दिले होते. निवेदनात म्हटले होते की, नवीन नाशिक येथे सिडकोने सदनिका धारकांना ९९ वर्षे कराराने २५ हजार घरे विकली असून अंदाजे ५ हजार वेगवेगळया वापरांचे भूखंड वाटप केलेले आहेत. तसेच वेगवेगळया ठिकाणी अंदाजे 1500 टपरी भूखंडे देखील वाटप केलेली आहेत. सिडकोने ‘लिज होल्डने’ दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ करून घरधारकांना संपूर्ण मालकी द्यावी, अशी सिडकोवासियांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. छोट्या छोट्या घरांत राहणार्या सिडकोवासियांचा कुटुंब विस्तार वाढल्याने घराचाही विस्तार वाढवावा लागतो. वाढीव बांधकाम करतांना या कामगार व अल्प उत्पन्न गटातील घरधारकांना कर्ज काढावे लागते. मात्र, लिज होल्ड मालमत्ता असल्याने अनेक बँका कर्ज देत नाहीत.
तसेच काही वित्त संस्था याचा लाभ उठवत जास्त व्याजदराने कर्ज देऊन पिळवणूक करतात. लिज होल्ड ऐवजी ‘फ्री होल्ड’ मालमत्ता झाल्यास घरधारकाला घराचा पुनर्विकास करणे सुलभ होईल. तसेच, फ्री होल्डची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सिडको प्रशासकीय कार्यालयाचे कामकाज बंद करू नये, अशी विनंती महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवेदनाची दखल घेत सिडकोचे कार्यालय नाशिकमध्येच राहणार असल्याचे सांगितले, अशी महिती तिदमे यांनी दिली आहे.
लोकप्रतिनिधींचा विरोध
दरम्यान सिडकोचे कार्यालय हलविण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर नाशिक शहरातील लोकप्रतिनिधींनी यास विरोध केला होता. यामध्ये शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी दखल कठोर भूमिका घेतली होती. त्यानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत हा निर्णय अन्याकारक असल्याचे सांगितले. त्यानंतर आता प्रवीण तिदमे यांनी भेट घेत सिडको कार्यालय नाशिकमध्ये ठेवण्याची मागणी केली. दरम्यान या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबंधित विभागाला निर्देश दिले असून सिडको कार्यालय पूर्ववत सुरु राहणार असल्याचे समजते.