Abdul Sattar : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह इतर आमदार गुवाहाटी (Guvahati) दौऱ्यावर जात असताना मात्र कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे मात्र नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज ते शहरातील कृषीथॉन प्रदर्शनाला भेट देणार आहेत. विशेष म्हणजे सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे नाशिक शहरात आले आहेत. त्याचबरोबर गुवाहाटी दौऱ्यावर जाणार नसल्याने त्यांच्या गैरहजेरीची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आमदारांसह आज गुवाहाटीला (Guwahati) जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह आमदार मुंबई विमानतळावरुन गुवाहाटीच्या दिशेनं रवाना होणार आहेत. आमदारांसह खासदारही गुवाहाटीला जाणार आहेत. तिथे जाऊन सर्व आमदार कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी गुवाहाटीत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे शिंदे गटाचे महत्वाचे शिलेदार अब्दुल सत्तार हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत.
काल सायंकाळी उशिरा अब्दुल सत्तार नाशिकमध्ये दाखल झाले असून आज ते नाशिकच्या कृषीथॉन प्रदर्शनाला भेट देणार आहेत. आंतरराष्ट्रीय कृषीथॉन प्रदर्शनात ते परिसंवाद कार्यक्रमात सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रदर्शन भेटीनंतर सत्तार हे सिल्लोड मतदारसंघाकडे रवाना होणार आहे. मात्र दरवेळी आघाडीवर असणारे अब्दुल सत्तार कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार नसल्याने गैरहजेरीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे नाशिक दौऱ्यानंतर सत्तार कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
गुलाबराव पाटीलही गैरहजर
शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी व्हाया सुरत गुवाहाटी गाठलं होतं. तिथं त्यांच्यासह सर्व आमदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. तेव्हा कामाख्या देवीला केलेला नवस फेडण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सगळ्याच आमदारांसह गुवाहाटीला आज जात आहेत. मात्र मंत्री अब्दुल सत्तार हे नाशिक दौऱ्यावर असल्याने गुवाहाटीला जाण्याची शक्यता कमी आहे तर दुसरीकडे गुलाबराव पाटील देखील जाणार नसल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे गुवाहाटीला जाणार नसल्याचे त्यांनी स्वत: स्पष्ट केले आहे.
सत्तार पहिल्यांदा नाशिकमध्ये
दरम्यान सत्ता स्थापनेनंतर राज्याच्या कृषिमंत्री पदी अब्दुल सत्तार हे पहिल्यांदा नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. अब्दुल सत्तार हे नाशिक शहरातील आंतरराष्ट्रीय कृषीथॉन प्रदर्शनात सहभागी होणार असून या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.