Maharashtra Politics : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) मोठा भूकंप घडला आहे. राष्ट्रवादीतून एक गट बाहेर पडला आहे. अजित पवार यांच्यासोबत तीस आमदार असून त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यात विशेष म्हणजे राष्ट्रवादीशी निष्ठावान असलेले, शरद पवारांना जवळचे असलेले आमदार नरहरी झिरवाळ देखील अजित पवार यांच्यासोबत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून वर्षभरापूर्वी ज्या पद्धतीने शिवसेना (Shivsena) फुटून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आज त्याच घटनेची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. कारण अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत शिवसेना भाजप सरकारसोबत हातमिळवणी केली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे तीस आमदार असून राष्ट्रवादीचा एक गट शिंदे भाजप सरकारमध्ये सामील झाल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा देखील मंत्रिमंडळात सहभाग झाला आहे. मात्र दुसरीकडे आमदार नरहरी झिरवाळ (Narhri Zirwal) देखील अजित पवारांच्या सोबत आहेत, त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
नरहरी झिरवाळ अजित पवार यांच्यासोबत राजभवनात
काही दिवसांपूर्वी सत्तासंघर्षाचा निकाल लागणार होता. त्यावेळी अजित पवार नाशिक दौऱ्यावर होते. याचवेळी आमदार नरहरी झिरवाळ मात्र नॉट रिचेबल झाल्याचे पाहायला मिळाले. झिरवाळ यांचे सगळे फोन सकाळपासून बंद होते. त्यामुळे झिरवाळ हे सुरुवातीपासून राष्ट्रवादीशी एकनिष्ठ नेतृत्व असल्याचे सांगण्यात आले आहे. शरद पवारांनी अनेकदा झिरवाळ यांची स्तुती करत कामाचे कौतुक केले आहे. तर काही दिवसांपूर्वीच नाशिक जिल्ह्यातील सुरगाण्यात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला अजित पवार यांची उपस्थिती होती. यावेळी झिरवाळ यांनी आगामी काळात दादांना मुख्यमंत्री करु, असे ते म्हणाले होते. मात्र आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सर्वात मोठ्या घडामोडीत अजित पवार यांच्यासोबत आमदार झिरवाळ असल्याने चर्चा रंगल्या आहेत. आमदार झिरवाळ हे सुरवातीपासूनच अजित पवार यांच्या फेव्हरमध्ये असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे आजच्या राष्ट्रवादी फुटीतही झिरवाळ अजित पवार यांच्यासोबत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोणी शपथ घेतली?
दरम्यान आताच अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची (DCM Ajit Pawar) शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत शरद पवारांच्या नेतृत्वाला रामराम केला आहे. याचबरोबर छगन भुजबळ यांनी देखील अजित पवार यांच्यासोबत सरकारसोबत मंत्रिमंडळात सहभाग घेतला आहे. तसेच राजभवनात शपथविधीची जय्यत तयारी सुरु आहे. आदिती तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम या नावाचा समावेश आहे.
राष्ट्रवादीचा एक गट फुटला?
त्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली असून राष्ट्रवादीच्या 54 पैकी 30 आमदारांचा सरकारला पाठिंबा असल्याचे यावरुन दिसत आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत फक्त आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, अध्यक्ष शरद पवार यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते किंवा माहिती नसल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे निष्ठावान असलेले छगन भुजबळ हे देखील अजित पवारांच्यासोबत असून त्यासोबत दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ हे देखील शपथ घेणार असल्याचे समजते आहे. मात्र हा सगळा गोंधळ राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे.