Dhule Crime : काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) ग्रामीण पोलिसांनी फोन पेचा (Phoen Pay) आधार घेत अपहरण केलेल्या व्यक्तीचा शोध सिनेस्टाइल पद्धतीने लावला होता. असाच प्रत्यय धुळे पोलिसांना आला आहे. धुळे तालुका पोलिसांनी (dhule Police) एका जिओ फायबर नेटवर्कची केबल टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अपहरणाचा डाव उधळून लावला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून धुळे पोलीस ऍक्शन मोडवर आले असून गुन्हेगारीचा (Crime) बिमोड करण्यासाठी जोरदार मोहीम सुरु आहे. अशातच धुळे शहरातील भुरसिंग जोगी नामक केबल टाकण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे तीन अज्ञात लोकांनी अपहरण केलं आणि त्याला चारचाकी गाडीत डांबून राजस्थानकडे घेऊन जात होते. त्यादरम्यान पोलिसांना या अपहरणाची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवत अपहरण करणाऱ्यांचे लोकेशन पोलीसांनी शोधुन काढले. लोकेशन्सच्या आधारावर ग्वालियर जवळ रेल्वे थांबून तीची तपासणी करण्यात आली. या रेल्वेत अपहरण झालेला भुरसिंग जोगी आणि त्यांचे अपहरण करणारे तिघे संशयित पोलिसांनी जेरबंद केले. भुरसिंगचा घातपात होण्याआधीच त्याला सुखरूप वाचवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.


धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळे-सुरत महामार्गा लगत केबल टाकण्याचे काम करणाऱ्या भूरसिंग रमेशचंद्र जोगी (21) राहणार जिल्हा दौसा राजस्थान या मजुराला. दि. 18 रोजी रात्री तीन अज्ञातांनी चारचाकी वाहनामध्ये घालून उचलून नेत अपहरण केले होते. याबाबत त्याच्या साथीदारांनी धुळे पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास चक्र फिरवले. मोबाईल लोकेशनच्या आधारे या संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. लोकेशनच्या आधारे संशयितांचा पाठलाग करत धुळे तालुका पोलीसानी थेट मध्य प्रदेशातील ग्वालियार जवळील मोरेना रेल्वे स्थानक गाठले.


पोलिसांना लोकेशनच्या आधारे मिळालेल्या रेल्वेमध्ये हे तिघे संशयित असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित रेल्वे थांबवून संशयितांचा शोध घेतला असता त्या ठिकाणी तिघेही संशयित अपहरण झालेल्या राजस्थानी मजुरासह आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक करत मजदूर भुरसिंग जोगी याची सुटका केली. तालुका पोलिसांनी भुरसिंग जोगी याचा घातपात होण्याआधीच संशयितांना तात्काळ अटक करून त्याला सुखरूप वाचवले आहे. भुरसिंग जोगी याच अपहरण करण्यामागे काय उद्देश होता तसेच यात अजून कोणाचा सहभाग आहे? याचा तपास तालुका पोलीस करीत आहेत.