Nashik Crime : प्रेमासाठी वाट्टेल ते अशा अर्थाची म्हण सगळ्यांनाच ज्ञात आहे. अनेकजण प्रेमासाठी घरच्यांचा विरोध झुगारून संसार थाटल्याची अनेक उदाहरणे आहेत. शिवाय विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने स्वतःला संपविल्याच्या घटनाही काही कमी नाहीत. अशीच एक घटना नाशिक (Nashik) शहरात उघडकीस आली आहे. लग्नाला विरोध केला म्हणून नाशिकच्या प्रेमीयुगुलाने गोवा (Goa) गाठून विष प्राशन केल्याचे समोर आले आहे. यात तरुणाचा मृत्यू झाला तर तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत... हे वाक्य प्रत्येकालाच ठाऊक असत. तरुण-तरुणी प्रेमात पडतात. मात्र अनेकदा घरच्यांचा विरोध असला कि टोकाचे पाऊल उचलले जाते, असाच प्रत्यय नाशिक शहरात आला आहे. घरच्यांचा लग्नाला विरोध होता म्हणून नाशिक येथील एका प्रेमी युगलाने थेट गोवा गाठले. येथील एका हॉटेलमध्ये विष प्राशन (Suicide) करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या गंभीर घटनेत तरुणाचा मृत्यू झाला तर तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे, ती सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. 


नाशिक शहरातील गौरव यादव या 21 वर्षीय तरुणाचे एका 22 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी घरच्यांना आपल्या प्रेमसंबधाबाबत माहिती दिली. मात्र या संबंधांना दोघांच्या घरच्यांनी कडाडून विरोध केल्याने दोघांनी टोकाचे पाऊल उचलत, घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.  मात्र ते गेल्या आठवड्यात रेल्वेने नाशिकहून गोव्याला पोहोचले. त्याठिकाणी दोघांनी निर्णय बदलत समाजाला व घराला कंटाळून आयुष्याचा प्रवास संपवण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी गोव्यातील कोलवा परिसरात एका गेस्ट हाऊसमध्ये आपले नाव बदलत किशोर अय्यर या बनावट नावाने रूम घेतली. दरम्यान ३१ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांनी विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेत प्रयत्न केला. 


मात्र दुसऱ्या दिवशी दि. 01 नोव्हेंबर रोजी सायंकाळी गौरवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मुलीची तब्येत स्थिर असल्याचे कोलवा पोलिसांनी सांगितले आहे. घरच्यांचा लग्नाला प्रखर विरोध असल्याने पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे मुलीने पोलिसांना सांगितल्याची माहिती गोवा पोलिसांकडून समजते आहे. याप्रकरणी गोवा येथील कोलवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमेनो कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत असून या घटनेने खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.