Nashik Crime : नाशिकमधून (Nashik) गांजाची मोठी तस्करी होत असल्याचे उघड झालं आहे. नुकताच नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) कारवाईत तब्बल 61 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघं संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. 


नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत अमली पदार्थ तस्करीच्या (Smuggling) घटना उघडकीस आल्या आहेत. त्यात ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. बाहेरील राज्यातून नाशिकमध्ये गांजाची मोठी वाहतूक (Traffic) होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (Economic Offenses Branch) मिळताच त्यांनी सापळा रचून गांजाची होणारी तस्करी हाणून पाडली आहे. यात दोन संशयितांसह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. संशयित व मुद्देमाल आडगाव पोलीस स्टेशनच्या (Adgoan Police Station) ताब्यात देण्यात आलेला आहे. 


नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्री करणारे, बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत नाशिक पोलीस आयुक्तालयाकडूनसुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार तपास सुरु असताना विशाल देवरे यांना नाशिक शहरातील आडगाव परिसरात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. आडगाव परिसरातील जकात नाक्यावर वॅगनर कारमध्ये मोठया प्रमाणात गांजा असून तो विक्री करण्यासाठी येणार आहे. गुन्हे 01 शाखेचे पथक तयार होऊन तपासाला सुरवात झाली. त्यानुसार आडगांव शिवारात एका कारमधून काढून दुसऱ्या कारमध्ये ठेवण्यात येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. 


यामध्ये राशीद मन्सुरी, प्रितीष जाधव या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या दोघ संशयितांच्या ताब्यातून तब्बल 61 किलो 140 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. त्याचबरोबर दोन मोबाईल फोन, दोन कार असा एकुण 14 लाख 53 हजार 680 रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. दोघां संशयितांना  ताब्यात घेवुन पुढील तपासाकामी आडगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास आडगांव पोलीस करीत आहेत.


नाशिक पोलिसांची कामगिरी भारी पण.... 
एकीकडे शहरात राजरोसपणे गुन्हेगारी वाढत चालली असून आता अमली पदार्थांची तस्करी देखील नाशिक पोलिसांपुढे आव्हान आहे. एकीकडे शहरात चोरी, मारहाण, घरफोडी आदी घटना रोजच घडत आहेत. तर दुसरीकडे दोन दिवसांआड मोठी गुन्ह्यांची घटना उघडकीस येत आहे. त्यामुळे पोलीस देखील हैराण झाले असून छोट्या मोठ्या घटनांपासून ते मोठ्या घटनांपर्यंत केसेस असल्याने पोलिसांना नाकी नऊ आले आहेत. त्यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल होणे, दुरापास्त झाले आहे. यामध्ये चोरीच्या घटनांचा सुगावा लागलाच तर ठीक नाहीतर या फाईल्स कोपऱ्यात पडून राहत असल्याचे दिसून येत आहे.