Chhagan Bhujbal : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी (Godawari Project) प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता अहवालास रु. 1498.61कोटी इतक्या किंमतीस मान्यता प्रदान करण्यात आली असून याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे मांजरपाडासह (देवसाने) वळण योजनांच्या कामांना मिळणार गती मिळणार असून चतुर्थ प्रशासकीय मान्यतेनुसार 580.88 कोटी रुपयांची पुणेगाव दरसवाडीसह ओझरखेड पालखेड कालव्यांची अपूर्ण कामे पूर्ण होणार असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.


छगन भुजबळ यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर मागील महिन्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चतुर्थ प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती. त्यानंतर आज शासनाकडून चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता अहवालास रु. 1498.61कोटी इतक्या किंमतीस मान्यता प्रदान करण्यात आली असून याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. उर्ध्व गोदावरी प्रकल्प, जि.नाशिक हा प्रकल्प गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सर्वसाधारण व आदिवासी क्षेत्रातील असून गोदावरी नदीच्या उपनद्यांवर आहे. या प्रकल्पाच्या पाणी वापरानुसार नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील 74,210 हे. सिंचन क्षेत्रास लाभ होणार आहे. उर्ध्व गोदावरी प्रकल्पात वाघाड, करंजवण, पालखेड, ओझरखेड, तिसगाव व पुणेगाव अशा 06 प्रकल्पांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे करंजवण, वाघाड, ओझरखेड व पुणेगांव या प्रकल्पांच्या स्थिरीकरणासाठी देवसाने (मांजरपाडा) वळण योजना व इतर 11 प्रवाही वळण योजनांचा समावेश आहे. सदर प्रकल्पास यापूर्वी प्रथम, द्वितीय आणि तृतीय प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्या होत्या.  


दरम्यानचे काळात दरसुचीतील वाढ, भाववाढ, संकल्पनातील बदल, भूसंपादनाच्या किंमतीत झालेली वाढ, व इतर कारणांमुळे झालेली वाढ, इत्यादी मुळे प्रकल्पाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे गोदावरी मराठवाडा खोरे विकास महामंडळाने चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव मान्यतेस्तव शासनास सादर केला होता. उर्ध्व गोदावरी प्रकल्पाचा रु. 1498.61 कोटी इतक्या किंमतीचा चतुर्थ सुधारीत प्रशासकिय मान्यतेचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. बांधकामाची सद्य:स्थिती, किंमत वाढीची कारणमिमांसा, राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा अहवाल तसेच प्रकल्पातील कामाच्या अनुषंगाने व त्याची कार्यवाही याचा परामर्श घेऊन नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद या जिल्ह्यांना वरदान ठरणा-या उर्ध्व गोदावरी प्रकल्पाचे काम पुर्णत्वास नेण्याच्या उद्देशाने सन 2018-19 च्या दरसूचीवर आधारीत रुपये 1498.61 कोटी इतक्या किंमतीच्या चतुर्थ सुधारीत प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे. 


 काय आहे हा प्रकल्प?
शासन निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील 11 प्रवाही वळण योजनांसाठी 206.51 कोटी, देवसाणे मांजरपाडा प्रकल्पासाठी 464.40 कोटी, वाघाड प्रकल्पासाठी 5.7 कोटी, करंजवण प्रकल्पासाठी 7.76 कोटी, ओझरखेड प्रकल्पासाठी 8.13 कोटी, पालखेड प्रकल्पासाठी 03.61 कोटी, तिसगाव प्रकल्पासाठी 50.07कोटी, पुणेगाव प्रकल्पासाठी 12.5 कोटी असे एकूण 760.61 कोटींच्या निधीस मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कालवा व वितरिकांच्या दुरुस्तीसाठी एकूण 633.45 कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आलेली असून वाघाडसाठी 11.97 कोटी, करंजवणसाठी 4.98 कोटी , ओझारखेडसाठी 73.18 कोटी , पालखेडसाठी 67.90 कोटी ,  तिसगावसाठी 66 लक्ष,  पुणेगावसाठी 294.96 कोटी तर दरवसवाडीसाठी 179.79 कोटी रुपये निधिस मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. उर्ध्व गोदावरी प्रकल्पास मिळालेल्या चतुर्थ प्रशासकीय मान्यतेने जिल्ह्यातील जलसंधारणाचे प्रकल्प मार्गी लागणार असून येवल्यातील मांजरपाडासह जिल्ह्यातील 11 प्रवाही वळण योजनांच्या कामांना गती मिळणार आहे.