Nashik Fire : नाशिकच्या (Nashik) अंबड लिंक रोडवरील मीना ट्रेडर्स या भंगार गोदामाला आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भीषण आग (Fire) लागली होती. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आटोक्यात आणण्यात यश आले आहे.


नाशिकच्या सातपूर परिसरातील (Satpur) अंबड लिंकरोड आगीची घटना घडली. येथील ज्वलनशील पदार्थ साठवलेल्या गोडावुनला आज सकाळच्या सुमारास आग लागली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हे गोदाम प्लास्टिकचे असल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती. तसेच धुराचे लोटच्या लोट बाहेर पडत होते. बघ्यांची मोठी गर्दी ईथे झाली होती, महापालिका अग्निशमन विभाग (Nashik fire Briged) आणि एमआयडीसीच्या बंबांनी काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी मात्र लाखोंचा माल जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. 


अंबड लिंक रोडवरील शाबू मकबल अहमद खान यांनी आझाद नगर भागात भाड्याने गोडाऊन घेतले आहे. या ठिकाणी ज्वलनशील साहित्यासाठी गोडाऊन तयार केले होते. आज सकाळी या ठिकाणी आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामध्ये गोडावूनमधील फोमसह इतर साहित्य जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची भीषणता अधिक असल्याने जवळपास तीन तासानंतर आग आटोक्यात आली. 


पाच बंबांनी रोखली आग 
दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच शहरातील सातपूर, अंबड, एमआयडीसी, मुख्यालयाचे एकूण पाच बंब घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी केंद्रप्रमुख प्रदीप परदेशी, संजय लोंढे आदीं अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेत आग आटोक्यात आणली. मात्र आगीचे कारण अस्पष्ट असून एक महिन्यातच या गोदामाला दुसर्‍यांदा आग लागल्याने संबंधित घटनेची पोलिसांकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी अग्निशमन विभागाकडून करण्यात येते आहे.


आगीच्या घटनांमध्ये वाढ 
सातपूर, अंबड एमआयडीसी, द्वारका भाग हा शहरातील वर्दळीचा भाग असल्याने परिसरात सातत्याने आगीच्या घटना घडत असतात. अशावेळी आग लागण्याचे किरकोळ कारण  असते,मात्र दाटीवाटीचा परिसर असल्याने आग रौद्ररूप धारण करते. शिवाय गर्दीचा भाग असल्याने अनेकदा अग्निशमन  विझवण्यासाठी अडचणी निर्माण होता. तसेच बंबही निश्चित स्थळी पोहचत नसल्याने आग विझवण्यास विलंब होतो. दरम्यान मागील महिन्यातच द्वारका परिसरात झोपटपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती.