Girish Bapat On Devendra Fadanvis: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी देऊन खासदार करावे, अशी मागणी केली. त्यानंतर पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. त्यावर पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांनी मात्र सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांना खासदारकी दिली तर काहीच हरकत नसल्याचं त्यांनी माध्यामांशी बोलताना सांगितलं आहे.


देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे हिरे आहेत. त्यांचं काम संपुर्ण महाराष्ट्राने जवळून पाहिलं आहे. गेले दोन महिने त्यांच्यात असलेली हिंमत देखील आपण सगळ्यांनीच अनुभवली. काही संघटनेकडून त्यांना पुण्याचे खासदार करा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी माझी काहीच हरकत नाही आहे. त्यांना खासदारकी दिली तर मला आनंदच होईल. कारण पुणे, पश्चिम महाराष्ट्राने त्यांच्या कामाची दृष्टी पाहिली आहे. त्यामुळे या गोष्टीचा आनंद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.


पक्षाच्या कोणत्याच आदेशाच्या बाहेर आम्ही दोघेही नाही. त्यामुळे पक्षाचा निर्णय अंतिम असेल. पक्ष सांगेत त्याप्रमाणे पुढची वाटचाल करु. भाजपमध्ये सगळेच प्रमाणिक आहेत. त्यामुळे त्यांच्या खासदारकीने कोणावर अन्याय होण्याचा काही प्रश्न उपस्थित होत नाही. पुण्यात भाजपचे अनेक कार्यकर्ते आहेत मात्र पक्ष राज्याचा सर्वांगिण दृष्टीने विचार करतो. देवेंद्र फडणवीसांनी मागील काही वर्षात महाराष्ट्राचा विकास केला. चांगली कामे केली. अनेक रखडलेली कामे पुर्णत्वास नेली. आरक्षणापासून शेतकऱ्याच्या प्रश्नांपर्यंत सगळीकडे चोख लक्ष दिलं. त्यांना खासदारकी देण्याचा पक्षाने निर्णय घेतला तर आम्ही त्याचं स्वागत करु, असं देखील ते म्हणाले.


चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस जातीपातीच्या आधारे नाही तर त्यांच्या स्वत:च्या कर्तुत्वावर इतके वरती आले आहेत. त्यामुळे, पक्ष त्यांच्या कर्तृत्वाचा विचार नेहमीच करतो. ब्राह्मण महासंघाने पत्रात म्हटले होते की प्रत्येक वेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुण्यात  भाजपच्या मागे ठामपणे उभा आहे. त्यामुळे 2024 ला देवेंद्र फडणवीस यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.


ब्राह्मण महासंघाने का केली मागणी?
भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून या संघटनेने ही मागणी केली आहे. फडणवीस यांची निवड अत्यंत मोलाची असून त्यांनी दिल्लीतील राजकारणाची सुरुवात पुण्यातून करावी, अशी इच्छाही महासंघाने पत्रात व्यक्त केली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आहे. फडणवीस पालकमंत्री झाल्यास जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लागतील, त्यामुळे ते जिल्ह्याच्या हिताचे असल्याचे बोलले जात आहे.