Nashik Accident News : 'सप्तशृंगी गडावरून (Saptashrungi Gad)  बुलढाणा (Buldhana) येथील खामगावसाठी सकाळी साडे सहा वाजता बस निघाली होती. सकाळी दाट धुके असल्याने पुढचं काहीच दिसत नव्हतं अशातच, गणपती पॉईंटजवळ गाडी असताना वळण न घेता थेट दरीत कोसळली. तेव्हा नेमकं तिकीट बुकिंग झालंच होतं, अन् प्रवाशी मोजायचं काम सुरु होतं, गाडीचा स्पीडही कमीच होता, पण धुक्यामुळे अपघात झाला असावा', अशी अपघाताची कहाणी जखमी वाहकाने सांगितली. 


आज सकाळच्या सुमारास नाशिकच्या (Nashik News) सप्तशृंगी गड घाटात (Saptashrungi Gad Ghat) बसला भीषण अपघात (Bus Accident) झाला. सप्तशृंगी गडावरुन बस साडेसहा वाजता निघाल्यानंतर पुढच्या दहा मिनिटात घाटातील गणपती पॉईंटजवळ बसला अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही बस सप्तशृंगी गडावरुन खामगावच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. यातील जखमींपैकी बसच्या वाहकाने सकाळी घडलेला थरार कथन केला. 


गाडी निघाल्यानंतर दहा मिनिटात अपघात झाला... 


जखमी वाहक गजानन तपके म्हणाले, 'साडेसहा वाजेच्या सुमारास आमची बस सप्तशृंगी गडावरुन खामगावकडे रवाना झाली होती. दहा मिनिटानंतर गणपती पॉईंटपर्यंत बस पोहोचली. या सुमारास धुके भरपूर असल्याने रस्त्याचे वळण कदाचित चालकाचे लक्षात आलं नसावं, त्यामुळे गाडी थेट दरीत कोसळली असावी, असे वाहकाने सांगितले. गाडीचा स्पीड सुद्धा कमी होता, उतार असल्यामुळे बुकिंग संपून मी प्रवासीच मोजत होतो, तेवढ्यात हा अपघात झाला'. 'यावेळी एक आजीबाई माझ्याच बाजूला होत्या. त्याचे तिकीट काढल्यानंतर त्यांना घाटात वळणे असून व्यवस्थित धरुन बसा', असेही सांगितले. पुढच्या काही मिनिटात बस दरीत कोसळल्याचे वाहकाने सांगितले. 


सगळे बसच्या सीटखाली दाबले गेलो.... 


तर प्रवासी महिला म्हणाली की, 'काल दर्शन केल्यानंतर मुक्काम करुन आज सकाळीच घरी परतत होतो, सकाळी खामगाव बसने निघालो होतो, मात्र प्रवास सुरु होताच, काही अंतरावर बस थेट दरीत कोसळली'. 'आम्ही सगळेच बसच्या सीट खाली दाबले गेलो. बसमध्ये सर्व आरडाओरड सुरू होती. कुणीही बसच्या बाहेर फेकले गेले नाही, सगळे बसमध्येच होतो, मात्र एकमेकांच्यावर दाबले गेल्याने सगळे प्रवाशी जखमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी पोहोचले. सकाळपासूनच सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरु झालं होत. आतापर्यंत काही जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काही जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik Accident News : सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; बस थेट 400 फूट दरीत कोसळली, एकाचा मृत्यू, 18 जखमी