मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर आज नागपूर, सोलापूर आणि अमरावती  महापालिकेची प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर  राजकीय नेते आणि इच्छुकांचे लक्ष आगामी निवडणुकाकडे लागले आहे. दरम्यान ही प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकांचे वारे वाहू लागणार आहेत.


दरम्यान कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून रखडलेल्या राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपालिकाच्या निवडणुका रखडल्या होत्या.  महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होणे अपेक्षित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया 15 दिवसात थांबलेल्या टप्प्यावरून पुढे सुरु करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आता निवडणूक आयोगाने राज्यातील 14 महापालिकाना निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश देत कार्यक्रम आखून दिला होता. या कार्यक्रमानुसार  17  मेपर्यत अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याच्या आदेशाचे पालन करत  महापालिका प्रशासनाकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.


सोलापूर महानगरपालिका 


सोलापूर महानगरपालिकाची अंतिम प्रभाग रचना पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी जाहीर केली. प्रस्तावित प्रभाग रचनेत सात प्रभागाच्या रचनेत बदल करण्यात आले असून एकूण 38 प्रभाग सोलापूर महानगरपालिकेचे असणार आहे. 38 पैकी 37 प्रभाग हेच तीन सदस्यांचे आणि एक प्रभाग हा दोन सदस्यांचा असेल. 16 प्रभाग हे अनुसूचित जातीसाठी तर दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहेत. 


नागपूर महानगरपालिका


नागपूर महापालिकेत यापुढे 38 ऐवजी 52 वॉर्ड असणार आहेत. या अधिसूचनेत वॉर्डच्या नवीन सीमा जाहीर करण्यात आल्या आहेत.   नागपूर महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार आता प्रभागांची संख्या 52 झाली आहे. या आधी नागपूर महानगरपालिकेत 38 प्रभाग होते. त्यामध्ये आता नव्या 14 वार्डची वाढ झाली आहे. पूर्वी नागपूर मनपात 151 नगरसेवक होते, ही संख्या 156 होणार आहे. 


अमरावती महानगरपालिका


अमरावती महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.  33 प्रभागा पैकी केवळ 7 प्रभागाचे नाव बदलले आहे. पूर्वी अमरावती मनपात होते 22 प्रभाग नवीन रचनेनुसार प्रभागांची संख्या  33 झाली आहे.  पूर्वी अमरावती मनपात होते 87 नगरसेवक आता संख्या 98 होणार आहे. अमरावती मनपात 11 प्रभागासह 11 नगरसेवक वाढले  आहे.