नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भोकर, बारड, अर्धापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने तिळाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दरम्यान परिपूर्ण भिजवण क्षेत्र असणाऱ्या या भागातील शेतकरी सातत्याने वेगवेगळे प्रयोग राबवत असतात. असाच एक प्रयोग नायगाव तालुक्यातील इकळी मोरे येथील शेतकऱ्याने केला आहे. इकळी येथील अल्पभूधारक शेतकरी गणपत दिगंबर मोरे यांनी उन्हाळी हंगामात दीड एकरात तिळाचे दहा क्विंटलचे उत्पादन घेतलं आहे. 


तीन एकर एवढे क्षेत्रफळ शेती असणारे दिगंबर मोरे यंनी नांदेड जिल्ह्यातील बारड येथील नातेवाईक शेतकऱ्याचा पीक बदलाचा प्रयोग पाहिला. त्यांचं मार्गदर्शन घेऊन गेल्या तीन वर्षांपासून तिळाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. ज्यात प्रामुख्याने मोरे यांनी वर्षभरात तीन पिके घेतली असून त्यात त्यांना भरघोस उत्पादन मिळाले आहे. त्यांचा हा पीक बदलाचा प्रयोग नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


गणपत दिगंबर मोरे यांची तीन एकर शेती असून ती बागायती आहे. ते वर्षभरात सोयाबीन, हरभरा आणि तिळाचे पिक प्रामुख्याने घेतात. हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन, त्यानंतर हरभरा तर उन्हाळी म्हणून तिळाचे पिक घेतात. या तीळ पीक लागवडीतून एकरी दोन किलो बियाणे, एक पोते खतासह त्यांना लागवडीसाठी एकूण दोन हजार रुपय खर्च आला. तर एक दोन वेळा पाणी दिल्यानंतर निदणी आणि खुरपणी केली जाते. विशेषतः तीळ या पिकास जनावरे, डुकरे खात नाहीत आणि फवारणीचा खर्च ही लागत नाही. त्यातच या पिकाचा उत्पादन कालावधी तीन महिन्याचा आहे. यात एकरी सरासरी सहा क्विंटल उत्पादन होते. 


आजघडीला तिळाला दहा ते पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळतो. हिवाळा, उन्हाळ्याच्याही हंगामात हे पीक घेता येते. औषध, फवारणीचा खर्च नाही. कोणताही रोग येत नाही, आला तरी टिकत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना तिळाचे पिक परवडेल असे आणि फायद्याचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किमान उन्हाळ्यात तिळाचे पिक घेऊन भरघोस उत्पादन मिळवावे अशी भावना मोरे यांनी व्यक्त केली आहे.


तीळ हा मसालेयुक्त पदार्थ असून भारतीय खाद्यपदार्थत  याला फार महत्व आहे. तसेच तिळाचे खाण्यासाठी, मसाजसाठी तिळाच्या तेलाचा उपयोग केला जातो. तर आयुर्वेदात तिळाच्या तेलास अनन्यसाधारण महत्व आहे.स्वयंपाकासाठी व खाण्यासाठी तिळाचे तेल एक उत्तम खाद्यवर्धक तेल म्हणून ओळखले जाते. तर लहान बाळाच्या मसाजसाठी, पोटवीकार असणाऱ्या रुग्णास तीळ तेल पाजणे, जनावरांसाठी तील तेल पाजणे आदी गोष्टीसाठी आरोग्यवर्धक समजले जाते