Maharashtra ST Employee: राज्याची प्रवासी वाहतुकीची लाइफलाइन अशी ओळख असणाऱ्या एसटी महामंडळात महिलांकडेदेखील विविध जबाबदाऱ्या आहेत. एसटीमधील या महिला कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत.  एसटी महामंडळातील महिला कर्मचारी तसेच अधिकारी यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मंजूर करण्याचा निर्णय तत्कालीन परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी 2018 मध्ये जाहीर केला होता. पण त्याची अंमलबजावणी नीट होत नसल्याची खंत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली आहे.


महिला कर्मचाऱ्यांना  प्रसूतिकाळात सहा ऐवजी नऊ  महिन्यांची रजा देण्याचा निर्णयदेखील महामंडळाकडून घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होते. पण मागील जवळपास दोन वर्षांपासून या बालसंगोपन रजेचा लाभ काही महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांना मिळालेला नाही असे बरगे यांनी सांगितले.


प्रशासनाविरोधात संताप


सण असो, अथवा यात्रा, किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांना नोकरीवर हजर राहत सेवा बजवावी लागते. त्यामुळे ना रजा, ना रजांचा मोबदला, तसेच कुटुंबासाठी वेळ देता येत नसल्याने एसटी महामंडळातील महिला एसटी कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा देण्याचा निर्णय तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी  घेतला होता. यामध्ये मुलाचे शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावे व त्यांच्याकडे काही वेळ का असेना, लक्ष देता यावे हा  सामाजिक दृष्टीकोन ठेऊन हा निर्णय घेण्यात आला होता.  तरीही त्याचे पालन नीट होत नसल्याने अनेक महिला कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला असून सर्वसामान्य प्रवाशांसोबत पंढरपूरची वारी असो, कोरोनासारखे भयाण संकट असो, गणेशोत्सव-होळी असो अथवा राज्यातील कानाकोपऱ्यातील कोणत्याही गावची यात्रा असो. एसटी बस आणि कर्मचारी कायम प्रवाशांच्या सेवेत तत्पर राहिले आहेत; मात्र नोकरी करत असताना एसटीतील महिला कर्मचारी व अधिकारी यांना त्यांच्या मुलांच्या परीक्षांच्या काळात पालकांची गरज असते. पण तसे घडताना दिसत नाही. या उलट अधिकाऱ्यांकडून या रजा नामंजूर केल्या जात असल्याचे महिला कर्मचाऱ्यांनी म्हटले. 


रजेचा लाभ नाहीच 


राज्य सरकारच्या धर्तीवर  एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना १८०दिवसाची रजा कुठल्याही प्रकारचे बंधन न घालता मिळाली पाहिजे. या रजेचा लाभ महिला कर्मचारी तसेच पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी, तसेच ज्या कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे. अशा पुरुष कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे परिपत्रक निघाले होते .परंतु प्रत्यक्षात या बालसंगोपन रजांचा लाभ अनेकांना मिळत नाही. केवळ रजाच नाही, तर त्या रजांच्या बदल्यात मोबदला एसटी महामंडळाकडून देण्यात येत नसल्याचा आरोप एसटी कर्मचारी काँग्रेसचे बरगे यांनी केला. नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने विविध समाज मध्यमामध्ये महिलांचे प्रश्न मांडले जातात. त्यामुळे  महामंडळाने सुद्घा तोच दृष्टीकोन ठेऊन पूर्वी काढलेल्या परिपत्रकाची अमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी विशेष अधिकारी नेमावा असेही बरगे यांनी म्हंटले आहे.


बालसंगोपन रजा म्हणजे नेमके काय ?


डिसेंबर 2018 मध्ये महामंडळात कार्यरत महिला कर्मचारी, अधिकारी तसेच ज्या कर्मचाऱ्यांची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळलेली आहे, अशा कर्मचाऱ्यांना बालसंगोपन ही विशेष 180 दिवस रजा कमाल मर्यादिपर्यंत मंजूर करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. राज्य सरकारी कर्मचान्यांना या रजेसाठी लागू असलेल्या अटी व शर्ती एसटी महामंडळातील कर्मचान्यांनाही लागू असतील. मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत घेता येते.