चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) शहरात चोरट्यांनी चक्क खासदारांचा बंगलाच फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने त्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र चोरांनी घरातील कपाट फोडत सामानाची नासधूस केली आहे. घरफोडीची ही घटना काल रात्रीची घडली आहे. यावेळी केवळ चौकीदार आणि त्याची पत्नी बंगल्यात उपस्थित होते.
काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (Balu dhanorkar) यांचा चंद्रपूर शहरातील सरकार नगर येथे सूर्यकिरण नावाचा बंगला आहे. याच बंगल्यात त्यांचे कार्यालय सुद्धा होते. आता हे कार्यालय दुसरीकडे हलविले आहे. मात्र निवासासाठी खासदार धानोरकर या बंगल्याचा वापर करतात. मंगळवारी ते बंगल्यात मुक्कामी नव्हते. याची माहिती असलेल्या चोरट्यांनी बंगल्याचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी बंगल्यातील इतर खोल्यांचेही कुलूप तोडले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे संतापून त्यांनी सामानाची नासधूस केली.
घडलेल्या प्रकाराची तक्रार चौकीदाराने रामनगर पोलिसांत दाखल केली. विशेष म्हणजे त्याच रात्री सरकार नगर परिसरात आणखी दोन घरफोड्या झाल्या होत्या. पोलिसांनी बंगल्यातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा तिघे चोर कुलूप तोडून आत प्रवेश करताना दिसले. पोलिसांनी चोवीस तासांच्या आता या तिघांना अटक केली. रोहित इमलकर, शंकर नेवारे आणि तन्वीर बेग अशी आरोपींची नावे आहेत. चक्क खासदारांचा बंगला लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मागील काही दिवसांपासून चोरटे खासदारांच्या बंगाल्याची रेकी करीत होते त्यामुळेच खासदार नसताना त्यांनी बंगल्यात कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचे धारिष्ट्य केल्याची बाब यामुळे स्पष्ट झाली आहे.
संबंधित बातम्या :