Aurangabad News: पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केलेल्या ट्वीटने खळबळ उडाली आहे. लवकरच राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार असल्याचे विधान कंबोज यांनी केले आहे. त्यांच्या याचं विधानावरून आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत भाजपवर पलटवार केला आहे. तर मोहित कंबोजांचे वक्तव्य म्हणजे भाजपकडून केले जाणारे ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचं उत्तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. 


'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देतांना दानवे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय यंत्रणा बटिक झाल्याचं स्पष्ट होतोयं. हेच मोहित कंबोज आधीही बोलत होते आणि तसं घडलेलं आहे. याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला विचारूनच केंद्रीय यंत्रणा निर्णय घेतात. तर सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशीच्या मागणीला योग्य उत्तर देऊ असे दानवे म्हणाले. 


तर या धमक्याच असून, ब्लॅकमेलिंगचा भारतीय जनता पार्टीकडून केला जात असलेला प्रकार आहे. धाक धमक्या दाखवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे याला योग्य ते उत्तर सभागृहात देऊ असे दानवे म्हणाले. तसेच सभागृहाच्या बाहेर सुद्धा महाविकास आघाडीम्हणून आम्ही योग्य उत्तर देऊ. शिवसेनेकडून जारी करण्यात आलेला व्हीप शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या सर्वांना लागू होतो,असेही दानवे म्हणाले.


काय म्हणाले कंबोज? 


राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन मोठे नेते मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यातच मोहित कंबोज यांनी अधिवेशनापूर्वी केलेल्या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, असं मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याकडे मोहित कंबोज यांनी इशारा केला आहे, असा प्रश्न या ट्वीटनंतर उपस्थित झाला आहे. त्यातच आणखी एका ट्वीटमध्ये त्यांनी "2019 साली परमबीर सिंह यांच्या काळात बंद करण्यात आलेल्या सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे," असा उल्लेख केला आहे.  


विधानभवनांच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी...


पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस असून, विरोधी पक्षाच्या आमदारांनी अधिवेशनापूर्वी विधानभवनांच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून, तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. यावेळी शिंदे-फडणवीस सरकाराच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली. त्यामुळे पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.