मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला (MNS Leader Sandeep Deshpande Attack) प्रकरणी माहिती समोर आली आहे.  अशोक खरात यांनी हल्ला केल्याचा
चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.  संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याने उद्धव ठाकरेंची सहानुभूती मिळवण्यास मदत होईल असा आरोपी खरात याला विश्वास वाटत होता ही  बाब जबाबात उघड झाली आहे.   मुंबई गुन्हे शाखेने अशोक खरात आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. 


उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत आल्यानंतर बक्षीस देतील म्हणून महाराष्ट्र राज्य माथाडी आणि कामगार सेनेच्या अशोक खरात याच्याकडून हल्ला केल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.  मुंबई गुन्हे शाखेने अशोक खरात आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेने निलेश पराडकरला फरार आरोपी दाखवलं आहे.  या हल्ल्यात अद्याप तरी राजकीय अँगल नसल्याचा पोलिसांचा दावा आहे.  निलेश पराडकरचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.  


शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करताना झाला होता हल्ला


मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉक करत असताना काल (3 मार्च) चार अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला जातात याची आरोपींना कल्पना होती. हल्ला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. संदीप देशपांडे यांना थोडा मार लागला आहे. या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर मनसैनिकांनी संताप व्यक्त केला. तर, याची माहिती समजताच शिवाजी पार्क पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला होता.


मुख्यमंत्र्यांनीही केली होती संदीप देशपांडेंची चौकशी


संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची गांभीर्याने दखल घेत, स्वतः मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंची चौकशी केली होती. तसेच, हल्ल्यामागे जे कोणी आहे, त्याची चौकशी करुन आरोपींना कठोरातील कठोर शासन होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंना आश्वासन दिलं आहे. मुंबई पोलिसांकडूनही संदीप देशपांडेंवरील हल्ल्याची कसून चौकशी केली जात आहे. दादर पोलीस स्थानक, शिवाजी पार्क पोलीस स्थानक अशा सर्व जवळच्या पोलीस स्थानकांच्या टीम काल सकाळपासूनच याप्रकरणी तपास करत होत्या.