Weather Update: देशातील तापमानात (temperature) सातत्यानं बदल होत आहे. कुठे पाऊस (Rain) पडत आहे तर कुठे उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात उन्हाचा तडाखा कायम आहे. मात्र, देशाची राजधानी दिल्लीसह काही राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तर आसाममधील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.


दिल्लीत आजही पावसाची शक्यता


हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, आज (20 जून) दिल्लीत कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. यासोबतच दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 जूनपासून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेश उष्णतेने होरपळत आहे. 


कुठे पाऊस पडेल


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आसाम, पश्चिम बंगाल, सिक्कीम तसेच मध्य प्रदेशात पावसाची शक्यता आहे. याशिवाय तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, केरळ आणि पश्चिम हिमालयात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. मध्य प्रदेशातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बिहार, झारखंड, छत्तीसगड, कोस्टल आंध्र प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेशमध्ये एक आठवड्यापेक्षा जास्त काळ उष्णतेची लाट होती. परंतु आता दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कारण वातावरणात हळूहळू बदल जाणवत आहे. बिहारच्या काही भागातही उष्णतेच्या लाटेबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


महाराष्ट्रात अद्याप पावसाची प्रतिक्षा कायम


सध्या राज्यातील बळीराजा पावसाच्या (Rain) प्रतिक्षेत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांची कामं खोळंबल्याचे चित्र दिसत आहे. सध्या मृग नक्षत्र सुरु आहे. अद्यापही या नक्षत्रात पाऊस झाला नाही. पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. मात्र, पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. अशीच स्थिती राहिल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. कृषी विभागाने खते, बियाणांचे नियोजन केले आहे. परंतु पाऊस नसल्याने खते, बियाणे पडून असल्याची स्थिती आहे. दरम्यान, चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करुन नयेत असे आवाहन कृषी विभागानं केलं आहे. 


राज्यात दरवर्षी जवळापास 150 लाख हेक्टरवर पेरण्या होतात. यंदा मात्र पावसाचा  18 जूनपर्यंत 1 लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी धूळवाफ पेरण्या झाल्या आहेत, मात्र पावसाअभावी त्यात देखील अडचणीत आल्या आल्याचं दिसून येतंय. पाऊस अधिक लांबल्यास कडधान्याच्या पेरणी क्षेत्रात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरवर्षी तळकोकणात पाऊसाची सुरुवात चांगली होते, पण यंदा तळकोकणातही पाऊस हवा तसा अद्यापही सक्रिय नाही. राज्यात 23 जुलैनंतरच चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढेपर्यंत पेरण्या देखील होणार नाहीत 




 



महत्त्वाच्या बातम्या: