भिवंडी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक आदिवासी वस्त्यांवर भीषण पाणी टंचाईची समस्या असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली. या बातमीची दखल घेण्यात आली असून भिंवडी तालुक्यातील पाण्याची समस्या दूर झाली आहे. काँग्रेस व्हीजेएनटी सेलचे शहर अध्यक्ष गोविंद माडेवार यांच्या वतीने तालुक्यातील कोल्हाचा पाडा परिसरात 100 पाण्याचे जार देण्यात आहे. जोपर्यंत पाण्याची समस्या दूर होत नाही तोपर्यंत पाणी पोहचवणार आणि बोअरवेल देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे . तर गावकऱ्यांनी माझाचे आभार मानले आहे.
माझाच्या बातमीनंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून सकाळपासूनच शासकीय यंत्रणाचा पाहणी दौरा सुरू आहे. लाखीवली ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आर कांबळे व अभियंता भास्कर पाटील तसेच तालुक्यातील मंडळ अधिकारी यांचा पाहणी दौरा सकाळपासून सुरू आहे. बोअर सुरू करून देण्यासाठी फक्त आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र अजूनही कोणत्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था या ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांचा घेराव येथील संतप्त नागरिकांनी केला व जोपर्यंत पाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत येथून जाऊ देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. मात्र संध्याकाळपर्यंत पाण्याची सोय करतो असे आश्वासन दिल्यानंतर अधिकाऱ्यांना जाण्यास परवानगी गावकऱ्यांना दिली. परंतु अजूनही पाण्याची सोय न झाल्याने नागरिकांना यंदा देखील फक्त आश्वासन मिळाले आहे.
भिवंडी ग्रामीणमधील जांभूळ पाडा, तेलिवडे पाडा, कोल्हा पाडा, येवई बारी पाडा, कांबे पागीपाडा, राहनाळ आनंद नगर, सावित्रीबाई फुले नगर, काटई ठेंगू पाडा, पारिवली कातकरी वाडी, अंबाडी उबरपाडा, उबरखांड (वाकीपाडा), नेवाडे, घोटगाव, दुगाड तोंडीचीवाडी, वेढे, वारेट, उसगाव, पिळंझे बुद्रुक व पिळंझे खुर्द अशा तब्बल 43 आदिवासी पाड्यांवर पाणी समस्या असल्याची माहिती संघटनेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
भिवंडी शहरापासून हाकेच्या अंतरावर पाण्याची भीषण टंचाई; नदीत खड्डे मारून खड्ड्यातील पाण्यावर भागवावी लागते तहान