भिवंडी : भिवंडी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक आदिवासी वस्त्यांवर भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे . येथील आदिवासी बांधवांना कोरड्या नदीत ओलावाच्या ठिकाणी खड्डा खोदून खड्ड्यात साचलेल्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे . मात्र शासकीय यंत्रणांचे याकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. आदिवासी पाड्यातील पाणी समस्येवर श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असून आदिवासी पाड्यातील नागरिकांना पाण्याची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध केली नाही तर तालुका प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे .
भिवंडी तालुक्यातील लाखिवली ग्रामपंचायत हद्दीमधील असलेल्या कोल्हाचा पाडा परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून तहान भागवावी लागते आहे. गेल्या पाच महिन्यापासून पाण्याची चणचण भासत असून हंडा भर पाण्यासाठी नदीपात्रात खड्डा खोदून त्या खड्यात झाऱ्याने साचलेल्या पाण्यात नागरिक आपली तहान भागवतात मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे .
भिवंडी तालुक्यात तब्बल 43 गाव पाड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याची तक्रार श्रमजीवी संघटनेच्या वतीने तालुका प्रशासनासह तहसीलदारांकडे केली आहे. लाखिवली या गावातील कोल्ह्याचा पाडा, वाण्याचा पाडा येथील आदिवासी कुटुंबियांवर तर खड्ड्यातील गढूळ पाणी पिण्याची वेळ आली असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे या पाणी टंचाईच्या समस्येबाबत मागील आठवड्यात भिवंडी पंचायत समितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीवेळी श्रमजीवी संघटनेने पाणी टंचाईचे भीषण वास्तव तालुका प्रशासनासमोर कथन केले असूनही अनेक वेळा तक्रारी करण्यात आले आहे. तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने केला आहे.
भिवंडी ग्रामीणमधील जांभूळ पाडा, तेलिवडे पाडा, कोल्हा पाडा, येवई बारी पाडा, कांबे पागीपाडा, राहनाळ आनंद नगर, सावित्रीबाई फुले नगर, काटई ठेंगू पाडा, पारिवली कातकरी वाडी, अंबाडी उबरपाडा, उबरखांड (वाकीपाडा), नेवाडे, घोटगाव, दुगाड तोंडीचीवाडी, वेढे, वारेट, उसगाव, पिळंझे बुद्रुक व पिळंझे खुर्द अशा तब्बल 43 आदिवासी पाड्यांवर पाणी समस्या असल्याची माहिती संघटनेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
याबाबत भिवंडी तहसीलदार यांना फोनद्वारे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमच्याकडे तक्रारी आल्या तर आम्ही टँकरने पाणीपुरवठा नक्की करणार असे आश्वासन दिले आहे. परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पाणी पुरवठा होत नसल्याने येथील नागरिकांना वणवण करून पाण्यासाठी नदीत खड्डा मारुन आपली तहान भागवण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. निवडणुका आल्या की मत मागायला सर्व येतात मोठमोठी आश्वासने देतात तुम्हाला विहीर बांधून देऊ तुम्हाला बोरिंग बांधून देऊ परंतु निवडणुका संपल्या की तोंड देखील दाखवत नाही. आम्ही जे पाणी सध्या पितो ते शासनाने पिऊन दाखवावे आमदार, खासदार यांनी आमच्या घरात येऊन हे पाणी पिऊन दाखवणार का असा प्रश्नही येथील नागरिकांनी केला आहे. तर भिवंडीत आमदार-खासदार केंद्रीय मंत्री असून शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रात खड्डा मारुन गढूळ पाणी पिण्याची वेळ येत असल्याने नागरिकांनी प्रथम पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
Trending News : पोलीस हवालदाराची भूतदया! तहानेने व्याकूळ माकडाची 'अशी' केली मदत, व्हिडीओ व्हायरल