मुंबई : कोरोना काळानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी विरोधकांना तोंड देण्यात सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून आलंय. मोजून आठ दिवस झालेल्या या अधिवेशनात विरोधकांनी वीज बिल ते अंबानी घराबाहेर स्फोटक गाडी आणि सचिन वाझे यावरून सरकारची कोंडी केली. इतकंच काय विरोधी पक्षनेत्यांनी मनसुख हिरेन प्रकरणात गृह खात्याला माहीत नसलेली माहितीच विधानसभेत मांडून सरकारला चकित केलं.
अधिवेशनाच्या तोंडावर संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची नामुष्की सरकारवर आली. त्यात अधिवेशनात अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेल्या गाडीच्या मालकाचा गूढरीत्या मृत्यू झाला आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे आणि गाडी मालक मनसुख हिरेन यांचे फोन वरील संपर्क याचा सिडीआर मांडला. हिरेन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेला जबाब देखील फडणवीस यांनी सभेत मांडले आणि ह्या गोष्टींना तोंड देताना सरकार चाचपडतना दिसत होती.
सचिन वाझे निलंबनासाठी विरोधकांनी इतकी आक्रमक भूमिका घेतली तरी सरकार त्याबाबत तयार नव्हते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला. सचिन वाझे प्रकरणी सरकार बॅकफूटवर आहे त्यात या प्रकरणाचा परिणाम सरकारच्या प्रतिमेवर होत आहे. त्यामुळे या चर्चेनंतर सभागृहात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेरीस सचिन वाझे यांच्या उचलबांगडी करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग ची नोटीस दिली.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण; सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करणार, गृहमंत्र्यांची घोषणा
शरद पवार यांना फोन करून या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर सरकारने सचिन वाझे यांच्या बदलीची घोषणा केली. ही घोषणा सरकारला काल देखील करता आली असती. तोपर्यंत विरोधकांनी सचिन वाझेला सरकार पाठीशी का घालत आहे यावरून सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारने बदलीचा निर्णय घेतला तरी तोपर्यंत सरकारच्या प्रतिमेला धक्का बसला हे नक्की.
राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला अनेक प्रश्न विचारले त्याला समाधानकारक उत्तर देण्यात सरकार कमी पडले आणि त्यानंतर सचिन वाझे प्रकरणी गृहखात्यातील माहिती सद्य मंत्री अनिल देशमुख यांच्यापेक्षा माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जास्त असल्याचे चित्र समोर आले..
एकूणच संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर कुरघोडी केली आणि सरकार विरोधकांना तोंड देण्यात कमी पडले.
देवेंद्र फडणवीस यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव