चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन कोरोनाचं हॉट-स्पॉट ठरत आहे. आतापर्यंत आनंदवनातील 239 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आनंदवन येथे आतापर्यंत 1200 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून दररोज 250 लोकांची चाचणी केल्या जात आहे. कोरोनाचा हा उद्रेक गेल्या एका आठवड्यात अचानक झाला आहे. यामुळं आनंदवनमध्ये पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
प्रशासनाने या ठिकाणीच एक कोविड केअर सेंटर तयार केले असून सध्या याठिकाणी 83 लोकांवर उपचार सुरू आहे. आनंदवनमध्ये झालेल्या कोरोनाच्या या उद्रेकाबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे कारण गेल्या एक वर्षापासून आनंदवनमध्ये बाहेरील लोकांना प्रवेश बंदी आहे. त्यामुळे उपचारासाठी बाहेर गेलेल्या एखाद्या आनंदवनमधील व्यक्तीमुळे हा संसर्ग आत आल्याची आणि या ठिकाणी सर्व व्यवस्था सामुदायिक असल्यामुळे तो तातडीने पसरल्याची शक्यता आहे.
राज्यात काल 9927 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 12182 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात काल 9927 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली . काल नवीन 12182 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2089294 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 95322 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.34% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.