Maharashtra News LIVE Updates 7th April : वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नाशिक : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नववर्ष स्वागत समिती तर्फे नाशिकच्या गोदाघाटावर 75 बाय 75 फूट भरडधान्यापासून महारांगोळी रेखाटण्यात आली असून 'राष्ट्रहितासाठी मतदान करा' असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. या महारांगोळीसाठी तब्बल 1200 किलो नाचणी, 300 किलो वरई, 400 किलो बाजरी, 100 किलो मुग, 50 किलो कोदरा, 400 किलो ज्वारी, 200 किलो राळा, 100 किलो उडीद आणि 200 किलो मसूर अशा एकूण 3000 किलो इतक्या भरडधान्यचा वापर करण्यात आला आहे. यासाठी 100 महिलांनी चार तास मेहनत घेतली. महारांगोळीतुन भरडधान्याचे महत्व सांगताना त्यातील विविधता, पर्यावरणपुरकता, पाण्याची बचत करणारे,आरोग्यासाठी उपयुक्त, उत्पन वाढीसाठी महत्वाचे, सशक्त व सकस आहार, समृद्धीचे भांडार असे महत्वही अधोरेखीत करण्यात आले आहे.
दौंड : दौंडमध्ये शरद पवार यांनी राहुल कुल यांचे समर्थक प्रेमसुख कटारिया यांची भेट घेतली. नागरिक संरक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची भेट घेतली. प्रेमसुख कटारिया यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून दौंड नगरपालिकेची सत्ता आहे. शरद पवार, प्रेमसुख कटारिया, आणि सुप्रिया सुळे यांच्या मध्ये बंद दाराआडा चर्चा झाली.
वर्धा : महाविकास आघाडीच्या वतीने वर्धा लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी कार्यकर्ता मेळावे घेण्यात येत आहे, या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमर काळे यांनी रामदास तडस यांच्यावर जोरदार टीका केली. रामदास तडस यांनी दहा वर्षात केलेलं एक तरी काम सांगावं जे लोकांच्या स्मरणात राहील. महात्मा गांधीजींचा जिल्हा असल्यामुळे गांधीजींच्या नावावर केंद्राकडून मोठा निधी आणू शकत होते परंतु जिल्ह्यासाठी रामदास तडस यांनी काय केले असा सवालही महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांनी रामदास तडस यांना विचारला.
अहमदपूर, लातूर : आज सकाळी अहमदपूर येथील मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी भीषण आग लागली होती. या आगीत दहा ते बारा दुकाने जळून खाक झाली आहेत. करोडो रुपयाचे नुकसान या आगीत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील गुनाले कॉम्प्लेक्स मधील दुकानांना भीषण आग लागली होती. पहाटेच्या आसपास ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी सहा वाजेपर्यंत याची माहिती अहमदपूरकरांना लक्षात आली. त्यानंतर यंत्रणेची प्रचंड धावपळ सुरू झाली. अहमदपूर नगरपालिका अग्निशमन दल, चाकुर, उदगीर आणि लोहा येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आलं होते.. तीन तास प्रशासनांना आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.
Bhiwandi News : भिवंडी आणि सांगली मध्ये फ्रेंडली फाईट म्हणजेच मित्रवत लढत घेण्याचा आमच्याकडे अखेरचा मार्ग आहे. भिवंडी मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार राहिलाच पाहिजे व त्यासाठी फ्रेंडली फाईट करावी, असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना दिल्याची माहिती भिवंडीचे पक्ष प्रभारी आणि वरिष्ठ काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी दिली आहे. भिवंडीत काँग्रेस सोबत विश्वासघात झालेला नाही. मात्र भिवंडीत काँग्रेस पक्ष जास्त मजबूत आहे. कोकणात आम्ही सर्व जागा शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला दिली आहे. त्यामुळे भिवंडीची जागा काँग्रेससाठी सोडावी असा आमचा आग्रह आहे. मात्र, तसे न झाल्यास भिवंडीत फ्रेंडली फाईट होईलच असे अनिस अहमद म्हणाले.
हिंगोली : भाजपाचे बंडखोर नेते लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठानकर यांची मनभरणी करण्यासाठी भाजपा नेते गिरीश महाजन आज हिंगोलीत
लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी अपक्ष उमेदवारी फॉर्म भरल्यानंतर गिरीश महाजन येणार हिंगोलीत
रामदास पाटील सुमठानकर यांची मन भरणी करण्यात गिरीश महाजन यशस्वी होतात का ह्याकडे सगळ्यांचे लक्ष
धाराशिव : फोनपेद्वारे पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई रंगेहाथ पकडले आहे. तुळजापुर महावितरण शाखेचे येथील वरिष्ठ तंत्रज्ञ नितिन शितापे आणि खाजगी व्यक्ती किशोर हंगरगेकर यांनी कारवाई न करण्यासाठी एका क्रेन चालकाकडून हंगरगा येथील महावितरणचे तीन इलेक्ट्रिक खांब आणि वायर तुटून नुकसान झाले होते याबाबत तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी तसेच राञीच्या वेळी लाईन जोडुन दिली म्हणून 10 हजार रुपयांची लाचेची मागणी करुन फोनपेद्वारे पाच हजार रुपये घेतले असता ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई : मागच्या आठ दिवसापासून वसई किल्ल्यात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने किल्ल्यात दोन पिंजरे लावले आहेत. जागोजागी CCTV कॅमेरे बसविले आहेत मात्र बिबट्या चा शोध लागला नाही. रात्रीच्या वेळी वसई किल्ल्यातील दोन्ही रस्ते बंद केले आहेत, किल्ला परिसरातील मच्छीमार, स्थानिक रहिवाशी यांच्या कामावर मोठा परिणाम झाला असून, बिबट्याच्या दहशतीखाली नागरिक हैराण झाले आहेत.
मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची अद्याप घोषणा न झाल्याने राष्ट्रवादीचे माजी आमदार आसिफ शेख यांनी या जागेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. काँग्रेस पक्षासाठी राखीव असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा अशी मागणी वरिष्ठ नेते शरद पवार यांचेकडे रमजान ईदनंतर करण्यात येणार असल्याचे आसिफ शेख यांनी सांगितले. दरम्यान, भाजपकडून डॉ.सुभाष भामरे यांची एक महिन्यापूर्वीच उमेदवारी जाहीर करण्यात आली असून महाविकास आघाडीतर्फे अद्याप धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे माजी आमदार आसिफ शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या जागेवर स्वतः साठी दावा केला आहे.
चांदवड, नाशिका : गोवा राज्यातील विदेशी दारूची महाराष्ट्रात अवैध रित्या तस्करी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर मुंबई - आग्रा महामार्गावरील नाशिकहून धुळेकडे जाणारा ट्रक सापळा रचून चांदवड शिवारात पकडत 43 लाख रुपयांचा विदेशी दारूचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. यात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला तसेच गोवा राज्य निर्मित आणि केवळ गोवा राज्यातच विक्री करीता असलेला मद्याचा मुद्देमाल संशयितांच्या ताब्यातुन एका टाटा ट्रकसह जप्त केला..आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हयाचे सीमावर्ती भागांतून गुटखा आणि मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीसांकडून तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे.
सटाणा : नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खमताणे येथे एका शेतात एक बिबट्या व त्याचे दोन बछडे वावरताना दिसले. त्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत सध्या कांदा काढणी चालू असल्यामुळे मजूर शेतात काम करत असतात..बिबट्याचा वावर पाहून शेत मजूर व शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या बिबट्याचा वावर खमताणे, पिंपळदर आणि नवेगाव या गावांकडे आहे. वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी खमताणे परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
शिर्डी : महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरात महायुतीचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याकडे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मात्र पाठ फिरवल्याचं दिसून आलं. कोल्हे विरुद्ध विखे हा संघर्ष गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे आणि त्यामुळेच विखे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्याला कोल्हे गैरहजर राहिल्याचं बोलले जातंय. तर या मेळाव्याला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सुद्धा वेळेत पोहोचू शकले नाही कारण ते साईबाबांच्या आरतीला गेले होते. ते ज्यावेळी या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत मेळावा संपलेला होता.
Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात आज प्रचाराचा पॉलिटिकल सुपर संडे
वाशिम : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुन्हा एक वेळा आज वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे या पावसामुळे जरी शेतकऱ्यांचा काही नुकसान होणार नसलं तरी मात्र गारपीट किंवा अति पाऊस झाल्यास येत्या जून मध्ये येणारा पावसाला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांची आज पुण्यात भेट झाली. या भेटीवेळी दोघांनीही एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. आमदार भीमराव तापकीर, उल्हासदादा पवार, दत्ता धनकवडे, आप्पा रेणुसे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पुण्यातील तळजाई टेकडी परिसरात ही भेट झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांशी संवाद साधला आणि शुभेच्छाही दिल्या.
Vidarbha Rain Prediction : विदर्भातील काही जिल्ह्यात पुढच्या तीन दिवसासाठी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट
नागपूर वेध शाळेने घोषित केला ऑरेंज अलर्ट
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात आज उद्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
मालेगाव : आगामी लोकसभा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात NRC, CAA आणि समान नागरी हक्क कायदा लावणार नसल्याचे नमूद करा, अशी मागणी मालेगाव मध्यचे माजी आमदार आसिफ शेख यांनी इंडिया आघाडीचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवत केली आहे. या पत्राच्या प्रति इंडिया आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेनेचे उध्दव ठाकरे, तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी आदींसह इंडीया आघाडीतील नेत्यांना देखील पाठविण्यात आल्या आहे. भाजप सरकारने जे काळे कायदे आणले आहेत, त्यामुळे अल्पसंख्याक समाज हा भीतीच्या वातावरणात जगत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात जर इंडिया आघाडीची सत्ता आली, तर NRC, CAA , समान नागरी हक्क कायदा हे कायदे लावणार नाही असे नमूद करून देशाच्या जनतेला शाश्वती द्यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
PM Modi in Chardrapur : चंद्रपुरात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे चंद्रपुरात तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक जाहीर सभा होणार आहे. यासाठी चंद्रपूर शहराजवळ मोरवा विमानतळाच्या अगदी बाजूला विस्तीर्ण 16 एकर परिसरात मोदींच्या सभेची तयारी केली जात आहे. दुपारी चार वाजता होणाऱ्या या सभेसाठी भाजपने युद्ध स्तरावर यंत्रणा राबविली आहे. हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अनुकूल करण्यात आला असून सुमारे एक लाख लोक या सभेला यावेत या दृष्टीने नियोजन सुरू आहे. आसपासच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व भाजपचे समर्थक देखील या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या रणातील मोदींची महाराष्ट्रातील ही पहिलीच जाहीर सभा संख्येच्या दृष्टीने परिणामकारक करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -