Maharashtra News Updates 2nd January 2023 : जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेमध्ये वाढ; गृह खात्याचे आदेश
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचे गृह खात्याने आदेश दिले आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्यांच्या जीवाला मोठा धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे गृह खात्याने आदेश दिले आहेत. जितेंद्र आव्हाड यांना सध्या वाय प्लस सुरक्षा आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता त्यांची सुरक्षा वाढवण्याचे गृह खात्याने पोलिस दलाला आदेश दिले आहेत. त्यांच्या दौऱ्यावेळी जास्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी गृहखात्याने परिपत्रक काढलं आहे.
राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. संपाचे गंभीर परिणाम होण्यापूर्वी मध्यस्थी करत मागण्यांवर विचार करण्याची विनंती धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोव्हिड काळात आपले प्राण पणाला लावून सेवा दिलेल्या डॉक्टरांना न्याय देणे शासनाचे आद्यकर्तव्य आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
आजपासून संपूर्ण राज्यात 18 हजार पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यातही पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. अमरावती ग्रामीण साठी शिपाई 156 तर चालक 41 पदासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे या एकूण 197 पदासाठी 13 हजार 500 अर्ज प्राप्त झाले आहे. आज पहाटे 6 वाजेपासून ही भरती प्रक्रिया राबविण्यात सुरुवात झाली आहे. यावेळी 40 सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक इव्हेंटवर व्हिडीओ कॅमेरा लावण्यात आले. तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोबाईल सकाळी जप्त ठेऊन ड्युटी झाल्यावर त्यांना मोबाईल परत दिला जाईल, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बरगळ यांनी एबीपी माझाशी बोलतांना सांगितले.
Nanded News: तेलंगणा राष्ट्र समिती पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून पक्ष वाढ करण्यासठी सज्ज झाली आहे. भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रातील पहिली सभा नांदेडमध्ये घेणार आहे. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री KCR अर्थात कुलवकुंथाला चंद्रशेखर राव यांच्या TRS (तेलंगणा राष्ट्र समिती)या पक्षाचे नाव बदलून त्यांनी BRS भारत राष्ट्र समिती हे नाव केलेय. दरम्यान TRS हा पक्ष फक्त राज्य स्तरावर न राहता त्याचे राष्ट्रीय पक्ष म्हणून वाटचाल सुरू करण्यासाठी TRS चे नाव बदलून BRS अथवा भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले आहे.
Nagpur Weather News : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गारठा वाढेल, असा हवामान विभागाने दिला आहे. डिसेंबरच्या शेवटी पारा 13 अंशांपर्यंत पोहोचल्याने तसे संकेतही मिळाले होते. मात्र नववर्षाच्या पहिल्या दिवशी किमान तापमानाने पुन्हा उसळी घेतली. रविवारी 15.6 अंश तापमानाची नोंद झाली, जी सरासरीपेक्षा 2.8 अंशाने अधिक आहे. दिवसाचा पारा मात्र सरासरीपेक्षा 2.1 अंशाने घटला असून 28.6 अंशाची नोंद करण्यात आली. जानेवारी महिना अत्याधिक थंडीचा असतो. या महिन्यात किमान व कमाल दोन्ही तापमानात घट होते. दिवसा सरासरी 21 ते 30 अंश तापमान असते. आणि रात्री सरासरी 12.5 अंश तापमान असते. गेल्या दशकभरात अनेकदा जानेवारीमध्ये पारा 10 अंशाच्या खाली घसरला आहे. अवकाळी पावसाची शक्यताही या महिन्यात अधिक असते. यावर्षी थंडी पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान या सीझनमध्ये म्हणावी तशी थंडी पडली नाही. दरम्यान, नागपूरकरांना अद्याप कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा जाणवतो पण नेहमीची थंडी नाही. पहाटे 4 ते 7 वाजताच्यादरम्यान काहीसा गारठा वाढलेला असतो पण सूर्य निघाल्यानंतर तोही निघून जातो. रात्री बहुतेकांच्या घरी पंखा लावून झोपण्याचीच परिस्थिती आहे. पुढचे काही दिवस किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Nagpur News : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे (Nagpur Smart City) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अजय गुल्हाने यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणूनही अजय गुल्हाने यांनी जबाबदारी स्वीकारली. नागपूरात जन्मलेले अजय गुल्हाने भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) महाराष्ट्र कॅडरच्या 2010 बॅचचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी यवतमाळ आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला असून ते वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा होते. ते नवी मुंबईतील 'जलस्वराज्य प्रोजेक्ट'चे प्रकल्प व्यवस्थापक सुद्धा होते. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांची गोंदिया येथे बदली झाल्यानंतर गुल्हाने यांची स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी सुद्धा देण्यात आलेली आहे.
राजकारण्यांनी इतिहासावर बोलताना संयम बाळगला पाहिजे, असे मत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केले आहे. औरंगजेबाचं निधन नगर जवळ झालं. तेथून त्याचं शेव कुलताबादमध्ये नेलं गेलं आणि तिथेच त्याची कबर आहे. राजकीय लोकांचा इतिहासाचा अभ्यास कमी आहे. इतिहासाचा सखोलपणा त्यांच्या लक्षात येत नाही आणि म्हणूनच ते असं बोलून जातात. आत्ताच्या राजकारण्यांनी इतिहासावर बोलताना संयम बाळगला पाहिजे. इतिहास जगापुढे चांगल्या पद्धतीने नेला पाहिजे. इतिहास पुढे नेण्यासाठी असे वाद अडचणीचे ठरणार आहेत. पुरावे असल्याशिवाय इतिहासाबद्दल बोलू नये, असे सावंत यांनी म्हटले आहे.
ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांची राज्य सरकार विरोधात हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल केली आहे. सिक्युरिटी कमी केल्याची याचिकेतून तक्रार करण्यात आली आहे. याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहसचिव, ठाण्याचे पोलीस आयुक्त यांनाही प्रतिवादी करण्यात आलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयात या याचिकावर पुढील सुनावणी 9 जानेवारी रोजी होणार आहे. ठाण्यातून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यावतीने वकील नितीन सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांची राज्य सरकार विरोधात हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल केली आहे. सिक्युरिटी कमी केल्याची याचिकेतून तक्रार करण्यात आली आहे. याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहसचिव, ठाण्याचे पोलीस आयुक्त यांनाही प्रतिवादी करण्यात आलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयात या याचिकावर पुढील सुनावणी 9 जानेवारी रोजी होणार आहे. ठाण्यातून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यावतीने वकील नितीन सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.
मुंबई : 4 जानेवारीपासून राष्ट्रवादीची जनजागर यात्रा सुरू होणार आहे. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून राज्यभर ही जगजागर यात्रा काढण्यात येणार आहे. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ही यात्रा असणार आहे. 4 जानेवारी रोजी पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यात्रेला झेंडा दाखवणार आहेत.
Akola News : मकरसंक्रांत आली की पतंग उडवणाऱ्यांची मोठी गर्दी होते. अकोल्यात पतंगाचा मांजा एका चिमुकल्याच्या जीवावर बेतता बेतता राहिल्याची घटना घडली. पतंगाचा मांजा गळ्याभोवती अडकल्याने एक चार वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला. वीर प्रकाश उजाडे असं या चिमुकल्याचं नाव आहे. या अपघातात त्याच्या श्वसननलिकेला गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर श्स्त्रक्रिया केल्यानंतर त्याचा जीव वाचला. मात्र, त्याच्या मानेला दहा टाके लागले आहेत. आईसोबत दुचाकीवर बाजारात जाताना ही दुर्घटना घडली. चायनीज मांजावर बंदी असताना राज्यभरात सर्रासपणे हा मांजा विकला जातोय.
Navi Mumbai News : नवी मुंबईतील खाडी किनारी गेल्या काही दिवसापासून आलेल्या परदेशी फ्लेमिंगो पक्षामुळे गुलाबी चादर पाण्यावर तरंगताना दिसू लागली आहे. ऐरोली ते पनवेल पर्यंत पसरलेल्या या खाडीमधील फ्लोमिंगो पाण्यासाठी पक्षीप्रेमी ही गर्दी करू लागले आहेत. या फ्लेमिंगोचा मे पर्यंत खाडी किनारी मुक्काम राहणार आहे.
भारतात गेल्या 24 तासांत 173 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. चीन, जपान, ब्राझील, अमेरिकेसह दक्षिण कोरियामधील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये आले आहे. भारतात सध्या कोरोनाचे 2670 सक्रिय रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी, 2 जानेवारी नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना संसर्गाची प्रकरणे आता 4,46,78,822 वर पोहोचली आहेत. यामधील 4,41,45,445 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.
Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख जामिनावर सुटल्यानंतर आज पहिल्यांदा ईडी कार्यालयात हजेरीकरता जाणार आहे. अनिल देशमुखांना देण्यात आलेल्या जामीनाच्या अटीमध्ये जामीन मिळाल्यानंतर दोन महिने ईडी कार्यालयात जाऊन हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अटींच्या पूर्ततेकरता आज देशमुख ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. अनिल देशमुख यांची 28 डिसेंबर रोजी कारागरातून जामिनावर सुटका झाली आहे
Nashik News : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी धर्मवीर नव्हते, या वक्तव्याप्रकरणी अजित पवार यांच्या विरोधात आज सकाळी दहा वाजता रविवार कारंजा व दुपारी १२ वाजता मुंबई नाका येथे येथे भारतीय जनता पार्टी, नाशिक महानगराच्यावतीने नाशिक शहरात दोन ठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहे. बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देखील नाशिकच्या संपर्क कार्यालयात आंदोलन करण्यात येणार आहे.
Sanjay Raut: शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहेच, पण त्यांनी आत्मपरीक्षण केल्यास शिवसेना पुन्हा एकसंध झाल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं. यावर आम्हाला आत्मपरीक्षणाची अजिबात गरज नाही. खरं तर त्यांनाच आत्मपरीक्षणाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
Pune Crime News: आधीच कोयता गँगच्या दहशतीखाली असलेलं पुणं एका क्रूर घटनेनं हादरलं आहे. पुण्यातील पाषाणमध्ये 100 रूपयांसाठी चार जणांनी विद्यार्थ्यांचा हात मनगटापासून कापला आहे. याप्रकरणी 2 जणांना अटक केली असून 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत वाढली आहे. अशातच केवळ शंभर रुपयांसाठी एका विद्यार्थ्याच्या हात मनगटापासून कापून टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुण्यातील पाषाण परिसरात घडलेल्या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ पसरली आहे. या घटनेत पंकज तांबोळी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची तक्रार आशुतोष माने या व्यक्तीनं पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रणव काशिनाथ वाघमारे (18) आणि गौरव गौतम मानवतकर (20) अशा दोन व्यक्तींना अटक केली आहे.
Dhule News: आज धुळे जिल्ह्यात एकीकडे 7.8 इतकी तापमानाची नोंद झाली असून कडाक्याच्या थंडीत एकीकडे वाढ झालेली असताना दुसरीकडे मात्र पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची गर्दी पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीतही पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरतीची पूर्णतः तयारी करण्यात आली, असून पुढील पाच दिवस चालणाऱ्या या पोलीस भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे.
Konkan Temperature Drops : तळकोकणात पारा घसरला असून तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. थंडीचा कडाका वाढला असून ग्रामीण भाग गारठून गेला आहे. नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून थंडीपासून संरक्षण करत आहेत. तसेच उबदार कपड्यांचा वापर करत आहेत. या कडाक्याच्या थंडीचा फायदा आंबा, काजू पिकाला होणार आहे. अनेक ठिकाणी धुकं देखील पडलं आहे.
Ahmednagar News : अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळात याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर यांनी नामांतराबाबत सरकार सकारात्मक असल्याचे उत्तर दिलं होतं. याबाबत महापालिका, तहसीलदार, पोस्ट ऑफिस, रेल्वे विभाग प्रमुख यांच्याकडून सविस्तर प्रस्ताव मागवला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र जिल्ह्याच्या नामांतराचा प्रस्ताव महापालिकेकडून मागवण्यात आल्याने महापालिका गोंधळून गेली आहे. याबाबत महासभा घेऊन तसा ठराव केला जाणार असल्याची माहिती आहे, मात्र स्थानिक नगरसेवक याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Maharashtra Weather Update : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भारतात थंडीची लाट पसरली आहे. पुढचे आणखी काही दिवस थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. थंडीच्या तडाख्याने महाराष्ट्रही चांगलाच गारठला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे वर्षाचा पहिलाच दिवस गारेगार गेला. मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून कमालीची थंडी पडली आहे. त्यामुळे मुंबईकरांना सध्या मुंबईत राहुनच माथेरानचा फील येत आहे. सोमवारी मुंबईत 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी मुंबईचं तापमान हे 15.6 अंश सेल्सिएस नोंदविण्यात आले. तर माथेरानमध्येही 15 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यभरातील अनेक शहरांमध्ये 11 ते 12 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
Ambernath News: अंबरनाथमध्ये चालत्या कारने अचानक घेतला पेट
कानसईच्या एएमपी गेट परिसरात रात्री लागली आग
आगीत गाडी संपूर्णपणे जळून खाक
सुदैवानं कुणालाही इजा नाही
अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
Corona Death in Japan : चीननंतर आता जपानमध्येही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जपानमध्ये कोरोना मृत्यांच्या संख्येत 16 पटीने वाढ झाल्याचे आढळून आले आहे. कोविड-19 ची आकडेवारी जमा करणाऱ्या वर्ल्डोमीटर वेबसाइटनुसार, रविवारी जपानमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले असून 326 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसर्या एका रिपोर्टनुसार, जपानमध्ये कोरोनामुळे मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, 2022 वर्षात 1 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत जपानमध्ये कोरोना महामारी शिगेला पोहोचली होती. 2021 वर्षामध्ये शेवटच्या तीन महिन्यांमध्ये 744 मृत्यू झाले होते, तर 2022 वर्षी ही संख्या 11,853 आहे.
Delhi Girl Dragged to Death : दिल्लीमध्ये (Delhi) नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरूणीला सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनाने फरफटत नेले. या अपघातात तरूणीचा मृत्यू झाला आहे. तरुणीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. तरुणीवर अत्याचार करून त्यानंतर मुलीची हत्या करण्यात आली आणि या घटनेला अपघात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप मृत तरुणीच्या आईने केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका कारने तरुणीच्या स्कूटीला टक्कर दिल्याने तिचा अपघात झाला, त्यानंतर ती कारच्या चाकामध्ये अडकली आणि कारने तिला सुमारे आठ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले अशी माहिती समोर येत आहे.
Parbhani Police Bharati : अनेक वर्ष रखडलेल्या पोलीस भरती (Police Bharati) प्रक्रियेला अखेर आजपासून सुरुवात झालेली आहे. आजपासून पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक क्षमता चाचणीला जिल्ह्या- जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे. परभणी जिल्ह्यातील एकूण 75 पोलीस शिपाई जागांसाठी 4900 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. यासाठी आज सकाळपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक क्षमता चाचणीला सुरुवात झाली आहे. भावी पोलीस होण्यासाठी हजारो उमेदवार सज्ज झाले आहेत.
Higoli News : हिंगोली पोलीस दलामध्ये 21 जागांसाठी आज सकाळपासूनच पोलीस भरती (Police Bharti) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पोलीस भरती प्रक्रियेसाठी कडाक्याच्या थंडीमध्ये उमेदवारांनी सकाळपासूनच रांगा लावल्यास पाहायला मिळत आहे.
Beed News: श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय भव्य मराठवाडा कृषी महोत्सवाचा शेतकरी महासत्संगणे समारोप झाला असून याप्रसंगी गुरुमाऊली मोरे महाराज त्याचबरोबर माजी मंत्री बबनराव लोणीकर जयदत्त क्षीरसागर यांची या समारोप कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कृषी महोत्सवांमध्ये विविध तज्ञांचे मार्गदर्शन झाले असून यामध्ये विषमुक्त शेती नवनवीन तंत्रज्ञान विज्ञानाचे प्रदर्शन त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे शेती उपयोगी साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले होते.
Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यात गेल्या 2 दिवसांत 2 जणांचा बळी घेणाच्या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. तोरगाव शेतशिवारात ही कारवाई करण्यात आली आहे. 30 आणि 31 डिसेंबर ला झालेल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी वनविभागाने या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले होते. तोरगाव शेतीशिवारातील घटनास्थळी वाघ पुन्हा नजरेस पडला होता. शुटर बी.एम. वनकर यांनी अचुक निशाणा साधत वाघाला बेशुद्ध केल्यावर पथकाने वाघाला जेरबंद केले.
पार्श्वभूमी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा चंद्रपूर आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. शिवाय आजपासून राज्यभरातील 7 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात होत असून धुळे जिल्ह्यात 3 हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. 5 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मैदानी चाचणीला आज सुरुवात होणार असून कडकाच्या थंडीत उमेदवारांची गर्दी होणार आहे. राज्यातील हिंगोली, परभणी, यवतमाळ, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यात ही भरती होणार आहे. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा चंद्रपूर आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर
भाजपच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45 (144) ची घोषणा केली आहे. यात 18 लोकसभा मतदारसंघ भाजपच्या हिट लिस्टवर आहेत. यापैकी दोन मतदारसंघात म्हणजे चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज दौरा करणार आहेत. औरंगाबादमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर भाजपाची सभा होणार आहे. यावेळी जे.पी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, भागवत कराड यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपाची ही औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीची सभा आहे.
आजपासून राज्यभरातील 7 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर जाणार
विविध मागण्यांसाठी मार्डने संपाचा इशारा दिलाय. अतिदक्षता विभाग वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचा संघटनेने इशारा दिला असून राज्यभरातील 7 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. शनिवार पर्यंत वेळ देउन देखील चर्चेचं निमंत्रण न मिळाल्याने आजपासून संघटना संपावर ठाम आहेत. राज्यातील सर्व शासकीय आणि महाविद्यालयात निवासी डॉक्टरांकडून निदर्शने केली जाणार आहेत. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील 172 डॉक्टर आजपासून काम बंद आंदोलन करणार आहेत. सोलापुरातील मार्ड संघटनेशी संबंधित संघटनाही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयातील दीडशे डॉक्टरांचाही संपात समावेश आहे.
आजपासून पोलिस भरतीसाठी मैदान चाचणी
पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात होत असून धुळे जिल्ह्यात 3 हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. 5 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मैदानी चाचणीला आज सुरुवात होणार असून कडकाच्या थंडीत उमेदवारांची गर्दी होणार आहे. राज्यातील हिंगोली, परभणी, यवतमाळ, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यात ही भरती होणार आहे.
मुंबई शीझान खानचे वकील आणि बहिणीची पत्रकार परिषद
अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य संयित शीझान खानचे वकील आणि बहिणी पत्रकार परिषद घेणार आहेत.
पुण्यात नीलम गोऱ्हेंची पत्रकार परिषद
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद होणार आहे.
धुळ्यात सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन
जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावे या मागणीसाठी सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात हे आंदोलन होणार आहे.
वर्धा येथे लाक्षणिक उपोषण
वर्ध्यानजीक असलेल्या आलोडी ग्रामस्थांचे स्मशानभूमीसाठी लाक्षणिक उपोषण, निस्तार हक्क डावलून प्रशासनाने शासकीय रेकॉर्डवरून स्मशानभूमी हटविल्याची माहिती. त्यामुळे लाक्षणिक उपोषण होतंय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -