Sambhaji Raje : राज्यसभेसाठी उत्सुक असलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स आजही कायम आहे. संभाजीराजे छत्रपती सोमवारपासून कोल्हापुरातच असून आज मुंबईच्या दिशेने रवाना होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे मुंबईत ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेणार की अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. संभाजीराजे आपला निर्णय जाहीर करण्यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशीदेखील चर्चा करण्याची शक्यता आहे.
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. सध्या तरी पाच उमेदवार सहजपणे निवडून जाऊ शकतात. तर, सहाव्या जागेसाठी चुरस असणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी सहावी जागा ही आपल्याला द्यावी, अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर चर्चेचा धुरळा उडाला आहे. शिवसेनेने संभाजी राजेंनी पक्षात प्रवेश करावा त्यानंतर उमेदवारी जाहीर करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर संभाजीराजे यांच्यावर दबाव वाढला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीराजे हे कोल्हापुरातील पॅलेसमध्ये मालोजीराजे आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करत आहे. संभाजीराजे कुटुंबासोबत चर्चा केल्यानंतर आपला निर्णय जाहीर करू शकतात.
शिवबंधन बांधणार?
कोल्हापुरातून आज पुन्हा संभाजीराजे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत. शिवसेनेत प्रवेश करावा असा दबाव त्यांच्यावर वाढला असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आज किंवा उद्या संभाजीराजे हातावर शिवबंधन बांधणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे उमेदवार म्हणून संभाजीराजे छत्रपती राज्यसभा उमेदवारी दाखल करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना आज सहावा उमेदवार जाहीर करणार?
शिवसेना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात सहावा उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी पक्ष प्रवेश न केल्यास शिवसेनेने इतर उमेदवाराचीही तयारी केली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापुरातील चेहऱ्याचा विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याही नावाची चर्चा आहे.