कोल्हापूर : कारागृह पोलिसाच्या बुटाच्या बॉक्समध्ये दोन चिठ्ठ्यांमधून कैद्यांच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी केली असल्याचे समोर आले आहे. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी किसन बिरलिंगे या पोलीस शिपायाची चौकशी करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृह गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत राहिले आहे. कधी या कारागृहामध्ये मोबाईल, सिम कार्ड, चार्जर इतकंच काय पण गांजा देखील सापडल्याचे समोर आले आहे. आणि आता या कळंबा कारागृहातीलच पोलीस शिपायाने आपल्या बुटाच्या सॉक्समधून कैद्यांच्या नातेवाईकाकडे 25 हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले आहे. किसन बिरलिंगे या पोलीस शिपायाची चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठवला आहे. मात्र चिठ्ठीमध्ये ज्या कैद्यांची नाव आहेत त्यांनी ही चिठ्ठी लिहिली नसल्याचे चौकशीदरम्यान समोर आले आहे. जर कैद्यांनी चिठ्ठी लिहिली नसेल तर ही चिठ्ठी कोणी लिहिली? आणि अजून किती कैद्यांच्या नातेवाईकांकडे अशा पद्धतीने पैशांची मागणी केली याचा तपास होणे गरजेचा आहे..
सॉक्समध्ये सापडलेल्या चिठ्ठीत काय लिहिलं?
किसन बिरलिंगे या पोलीस शिपायाच्या बुटाचे सॉक्समध्ये सापडलेल्या चिठ्ठीत 'माझे अर्जंट काम आहे. त्यासाठी चिठ्ठी घेऊन येणाऱ्या व्यक्तीकडे 25 हजार रुपये देण्यात यावेत' असं लिहून काही कैद्यांची नावे हे या चिठ्ठीमध्ये लिहिली आहेत. तपासणीदरम्यान संबंधित पोलिस शिपाईकडे दोन चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत.
कारागृह अधीक्षक काय म्हणाले?
किसन बिरलिंगे या पोलिस शिपायाचे रेकॉर्ड अतिशय खराब आहेत. चिठ्ठीमध्ये ज्या कैद्यांची नावं लिहिली आहेत, त्यांची चौकशी केली असता अशा पद्धतीने कुठलीही चिठ्ठी त्यांनी लिहिली नसल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित पोलिस शिपायाची चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला असल्याचे कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांनी सांगितले.
दोन ते तीन महिन्यापासून कळंबा कारागृह चर्चेचा विषय
कळंबा कारागृहमध्ये दोन महिन्यांपूर्वी टेनिस बॉलमधून गांजा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्याच्यानंतर काही दिवसातच कळंबा कारागृहमध्येच तब्बल दहा मोबाईल, सिम कार्ड आणि चार्जर आढळून आले होती. त्यानंतर सलग दोन आठवडे कळंबा कारागृहमध्ये मोबाईल सापडत होते. त्याच दरम्यान 750 ग्रॅम गांजा देखील कळंबा कारागृहमध्ये आढळून आला. त्यामुळे कोल्हापूरक्सचे कळंबा कारागृह यांची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू झाले आहे.