मुंबई :  संजय राऊत एकटे पडले आहेत का? हा प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा ठरला आहे.  कारण राज्यातलं सरकार बनवण्यात राऊतांचा मोठा वाटा आहे पण याच राऊतांसाठी महाविकास आघाडी सध्या शांतता दिसत आहे. 2019 सत्तासंघर्षाच्या काळात  संजय राऊत शिवसेनेसाठी ढाल बनून उभे होते. रोज रोजच्या पत्रकार परिषदांमध्ये एकच वाक्य ठणकावून सांगायचे ते म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. एक वेळ अशी आली की महाविकास आघाडीचं जुळलं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  शिवसेनेसाठी ढाल बनून उभे राहाणारे राऊत हळूहळू महाविकास आघाडीची ढाल बनू लागले आणि केंद्र असो किंवा राज्यातला विरोधी पक्ष भाजपला प्रत्युत्तर देऊ लागले 


आता हीच ढाल एकटी पडली का? संजय राऊतांच्या पाठिशी महाविकास आघाडी आहे का? हा प्रश्न विचारण्याचं कारण हे आहे की, सर्वांच्या ईडी कारवाईवर राऊत बेधडक बोलायचे.  पण आता राऊतांवरच्या कारवाईवर महाविकास आघाडीतले नेते ठोस भूमिका घेत नाहीत. ज्या संजय राऊतांनी आपल्या जीवाचं रान करून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. भाजपला दूर ठेवण्यासाठी तीन भिन्न विचारधारेच्या पक्षांना एकत्र आणलं तेच संजय राऊत एकटे पडले आहेत का? अशी चर्चा सुरु आहे.


संजय राऊत यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी करण्यात आली. सुजित पाटकारांचा थेट संबंध संजय राऊतांशी जोडत कोव्हिड घोटाळा केल्याचा आरोप लावला जातोय आता तर राऊतांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईविरोधात राऊत आणि त्यांची टीम एकटी पडली असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून वारंवार केला जातोय. कारण शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचा एकही मोठा नेता स्पष्ट भूमिका घेत नाही त्यामुळे विरोधक देखील राऊतांना एकटं समजू लागले आहेत.


संजय राऊतांच्या समर्थनार्थ भांडुप आणि औरंगबाद सोडून फार काही आंदोलन झाली नाही. शिवसेना राऊतांच्या सोबत आहे आणि सोबत राहणार असल्याचं बोलतेय पण नेमकी भूमिका काय हे अद्याप स्पष्ट होत नाही. राष्ट्रवादीकडून नवाब मलिक हे भाजपवर बेधडक बोलायचे पण सध्या तेही ईडीच्या कारवाईत अडकले आहेत. कॉंग्रेसच ईडी विरोधात वारंवार राजकारण असल्याचं बोलतेय पण ज्यांनी सरकार बनवलं त्यांच्यासाठी तिन्ही पक्षांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही. 


राज्याच्या राजकारणात संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात राऊतांचा मोठा वाटा आहे. पण आता हेच राऊत ईडीच्या कारवाईत अडकले आहेत. त्यामुळे जे महाविकास आघाडीसाठी ढाल बनून उभे राहिले त्यांच्यासाठी कोण ढाल बनून उभे राहणार ? की राऊत स्वत: स्वत:साठी ढाल बनणार? हा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha