रत्नागिरी : गेली चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जोरदार बसरणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. शिवाय, प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झाली आहे. वरुण राजा काही काळ विश्रांती घेतो आणि त्यानंतर पुन्हा बरसायला सुरुवात करतो. सद्यस्थितीत परिस्थिती पाहता काही भागांमध्ये पावसानं अल्पकालावधीकरता विश्रांती घेतली आहे. पण, वातावरण मात्र पावसाकरता पुरक असून आगामी काळात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 


खाडी किनारच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्राला देखील उधाण येत असल्यानं किनारपट्टीवरील नागरिकांना देखील त्याबाबतच्या सूचना दिल्या गेला आहेत. आगामी आणखी चार दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. 5 जून रोजी मान्सूनचं कोकणात आगमन झालं. पण, त्यानंतर 10 जूनपर्यंत पावसाचा पत्ता नव्हता केवळ पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. त्यानंतर 11 जूननंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू लागला. पण, हा पाऊस सरींवर होता. अखेर 13 जूननंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत गेला. आज घडीला जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती आहे. 


नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी सध्या 5.10 मीटर आहे. याच नदीची इशारा पातळी 6 मीटर तर धोका पातळी 7 मीटर आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीची सध्याची पाणी पातळी 3.60 मीटर आहे. तर, याच नदीची इशारा पातळी 5 मीटर असून धोका पातळी 7 मीटर आहे. लांजा तालुक्यातील काजळी नदीची सद्याची पाणी पातळी 13.63 मीटर असून काजळी नदीची इशारा पातळी 16.5 तर धोका पातळी 18 मीटर आहे. राजापुरातील कोदवली नदीची सध्याची पातळी 4.30 मीटर आहे. तर याच कोदवली नदीची इशारा पातळी 4.9 मीटर असून धोका पातळी 8.13 मीटर आहे. संगमेश्वर तालुक्यात शास्त्री, सोनवी आणि बावनदी या मुख्य नद्या आहेत. त्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. शास्त्री नदी सध्या 4.60 मीटरवरून वाहत आहे. शास्त्री नदीची इशारा पातळी 6.2 मीटर तर धोका पातळी 7.8 मीटर आहे. सोनवी नदीची सध्याची पाणी पातळी 4.40 मीटर आहे. याच नदीची इशारा पातळी 7.2 मीटर असून धोका पातळी 8.6 मीटर आहे. बावनदीची धोका पातळी 11 मीटर असून इशारा पातळी 9.4 मीटर आहे. सद्यस्थितीत या नदीची पाणी पातळी 5.75 मीटर आहे. तर, लांजामधील मुचकुंदी नदी सध्या 1.80 मीटरवरून वाहत आहे. मुचकुंदीची इशारा पातळी 3.5 मीटर असून धोका पातळी 4.5 मीटर आहे. (( सदर आकडेवारी ही 16 जून 2021 रोजी संध्याकाळी सहा वाजताची आहे. पावसाच्या प्रमाणानुसार त्यात सद्यस्थितीत बदल असू शकतो ))


कुठं घडल्या दुर्घटना?
रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे मोठी दुर्घटना अद्याप तरी झालेली नाही. पण, राजापुरातील बाजारपेठेत पाणी शिकण्याची शक्यता पाहता त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी सामान सुरक्षित स्थळी हलवण्याला प्राधान्य दिलं. तर नागरिकांना देखील सतर्क करण्यात आलं. रत्नागिरी तालुक्यातील काही ठिकाणी झाडं उन्मळून पडणे, रस्ता खचणे तसेच काही ठिकाणी घरांचं किरकोळ नुकसान झालं आहे. दापोली तालुक्यात पाचपंढरीमध्ये दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता दोन घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर, गुहागर तालुक्यात पालशेत इथं पूर आल्यानं बुधवारी संध्याकाळपर्यंत 12 गावांचा संपर्क तुटला होता. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र विजेचा लपंडाव सुरू असल्याचं चित्र आहे. 


शेतकऱ्यांचं वेळापत्रक कोलमडलं
सध्याचा काळ हो कोकणातील भातशेतीच्या कामांचा कालावधी. याचवेळी भातीची पेरणी केली जाते. पण, मुसळधार पाऊस आणि त्याबाबत हवामान विभागानं केलेलं आवाहन पाहता शेतकऱ्यांचं शेतीचं वेळापत्रक मात्र विस्कळीत झालं आहे. 


महत्वाच्या बातम्या :