Indurikar Maharaj : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची प्रकृती बिघडली असून येत्या ३० मे पर्यंत सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती खुद्द इंदुरीकर महाराजांनी एका पत्राद्वारे दिली आहे. 


आपल्या विनोदी शैलीने राज्यभर परिचित असलेले व अनेकदा महिलांबाबतच्या खोचक वक्तव्यामुळे चर्चेत आलेले निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र आता त्यांची प्रकृती बिघडली आहे. इंदुरीकर महाराजांना डॉक्‍टरांनी सक्तीच्या विश्रांती वर पाठवले आहे, अशा आशयाचं पत्र खुद्द निवृत्ती महाराज देशमुख यांनी प्रसिद्ध केले आहे.


इंदुरीकरांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे कि, प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली आहे. त्यामुळं दि. २३ ते ३० मे पर्यतचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. इच्छा असूनही कार्यक्रमात येऊ शकत नाही, त्यामुळे कार्यक्रमाच्या संयोजकांची, आयोजकांची गैरसोय होत आहे. त्याबद्दल रद्द करण्यात येत आहे. वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्व नियोजित कार्यक्रम पार पडतील. आपल्याला होणार्‍या गैरसोयीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे प्रसिद्ध झालेल्या पत्रकात महाराजांनी म्हटले आहे.


तसेच उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्व नियोजित कार्यक्रम पार पडतील. आपल्या सर्वांचे आशिर्वाद पाठीशी आहेत. असेच प्रेम कायम लाभावे ही अपेक्षा” हि इंदुरीकर महाराजांनी पत्रात व्यक्त केली आहे. शेवटी सहकार्याबद्दल धन्यवाद असेही त्यांनी नमूद केले आहे. 


कीर्तनाला जाताना अपघात 
दरम्यान इंदुरीकर महाराजांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी आराम करण्यास संगितले आहे. यापूर्वी इंदुरीकर महाराज परतूर शहरात कीर्तनासाठी निघाले असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. मात्र सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही इजा झालेली नव्हती. यावेळी ते आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होते. यावेळी लाकडं वाहून नेणाऱ्या एका ट्रॉलीला इंदुरीकर महाराज यांची स्कॉर्पिओ धडकल्याने हा अपघात झाला होता. 


स्वतः लिहले पत्र 
इंदुरीकर महाराजांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांनी स्वतः दिलगिरीचे पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी आगामी कार्यक्रम रद्द झालेल्या ठिकाणच्या आयोजकांचे आभार व्यक्त केले आहेत. मात्र येथील कार्यक्रमांच्या आयोजकांची गैरसोय होणार असल्याचे दिलगिरीही व्यक्त केली आहे.