बीड : लातूर ते औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर ते अंबाजोगाईजवळ अपघाताचे प्रमाण अचानक वाढले आहे. केवळ एका महिन्यात या ठिकाणी अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर आतापर्यंत 56 जणांचा बळी या रस्ते अपघात झाला आहे.  या ठिकाणांची बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी आज पाहणी केली आणि तात्काळ हे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. 


लातुर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्ग बर्दापूरच्या पुढे दुपदरी होती. अचानक अरुंद होणाऱ्या या रस्त्यावर विशेषत: बर्दापुर फाट्यानजीक सतत होणारे अपघात काळजीचा विषय बनला आहे. रस्ता झाल्यापासून बर्दापूर-वाघाळा या अपघातप्रवण क्षेत्रात 56 लोकांनी अपघातात जीव गमावला. त्यामुळे बर्दापुर फाटा ते अंबाजोगाई चार पदरी रस्त्याची मागणी जनतेमधून होत आहे. मागच्या आठवड्यात याच रस्त्यावर दोन मोठे अपघात होऊन दहापेक्षा अधिक लोकांचा जीव गेला. 


 जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडेंनी गंभीर दखल घेत मागच्या आठवड्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून उर्वरीत रस्ता चार पदरी करण्याची मागणी केली आहे. शनिवारी स्वत: खासदार अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या रस्त्यावर ज्या ठिकाणी अपघात होतात त्या भागाची स्पॉट पाहणी करणार आहेत. त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता स्वामी यांना संपर्क करून चार पदरीकरणाचा तात्काळ प्रस्ताव पाठवणे आणि जिथे अपघात होतात त्या भागात गतीरोधक आणि नामफलक लावावेत अशा तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. दरम्यान अंबा कारखान्याजवळील रखडलेल्या पुलाचे बांधकामही सुरू करण्याच्या बाबतीत खात्याअंतर्गत हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत आहे