Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक काढून मनसे कार्यकर्त्यांना आणि जनतेला भोंग्यांविरोधात आंदोलन तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिथं अनधिकृत भोंगे तिथं हनुमान चालिसा लावा. त्यांनाही कळू दे त्रास काय असतो असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हंटलं आहे. तर भोंग्यांवर बांग ऐकू येताच पोलिसांना फोन करुन तक्रारी द्या असं आवाहन देखील राज ठाकरेंनी नागरिकांना केलं आहे. याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे उतरवा असं सांगितलं होतं तर बाळासाहेबांचं ऐकणार की शरद पवारांचं असा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.
औरंगाबाद येथे झालेल्या 1 मे रोजीच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. शिवाय 4 तारखेपर्यंत भोंगे उतरवले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर आज राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबरोबरच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा देखील पाठवल्या आहेत. तरी देखील राज ठाकरे यांनी पत्रक काढून मनसे कार्यकर्त्यांना आणि जनतेला भोंग्यांविरोधात आंदोलन तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
काय म्हटलं आहे पत्रकात?
"मशिदींवरचे भोंगे 4 मेपर्यंत उतरवा, असं आम्ही सरकारला आधीच सांगितलं होतं. परंतु, याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. या देशातील राज्य सरकाररमधील प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देतोय. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, रुग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थ्यांना भोंग्यांच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, त्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की “रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल, परंतु 365 दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी रोज घ्यावी लागेल.”
सरकारने अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानगी कशी दिली?
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे की, सर्व भोंगे हे अनधिकृत आहेत. शिवाय बहुतांश मशिदी देखील अनधिकृत आहेत. हे सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानी का आणि कसे देते? परवानगी देणारच असाल तर आम्हालाही हिंदू देवळांनाही भोंगे लावण्याची परवानगी द्यायला हवी. हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. देशातील सर्वधर्मीयांना ध्वनिक्षेपकांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. ही बाब देशातील प्रत्येक सरकारला समजलीच पाहिजे. रस्त्यावर नमाजासाठी बसणं आणि वाहतूककोंडी करणं, हे कोणत्या धर्मात बसतं? म्हणूनच आमचे मुस्लिमधर्मियांना एवढंच सांगणे आहे की, हा सामाजिक विषय आहे, हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल.
...तर आम्ही देखील आमचा हट्ट सोडणार नाही
"आम्हाला देशातील शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु, आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की, या देशात, या राज्यात कायद्याचं राज्य' आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. त्यांनी अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर होणारे नमाज पठण यांना जबाबदार असलेल्या लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा.
हिंदूंच्या सणांना सायलन्स झोन, शाळा, रुग्णालय अशा सर्व प्रकारच्या अटीशर्तीच्या नावाखाली मर्यादा घालायच्या, परंतु मशिदींना कोणत्याही प्रकारच्या अटी घालायच्या नाहीत. भारतीय संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसते? म्हणूनच हिंदूंनो, त्यांना आपली हनुमान चालिसा ऐकवा. सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत. मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्यानंतर 100 या क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांच्या त्रासाबाबत तक्रार करावी.
महत्वाच्या बातम्या