मुंबई :  राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारविरोधात मंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde)  शिवसेनेच्या (Shivsena)  35 आमदारांचं बंड आणखी तीव्र होताना दिसतंय. कारण या आमदारांना गुवाहाटी नेलं जात आहे. बंडाचं निशाण फडकावणारे शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ 35 आमदारांचाच नाही, तर 40 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती एबीपी माझाच्या मिळाली आहे. एबीपी माझाच्या प्रतिनिधीसोबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. 


शिवसेना वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे मात्र अद्याप एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत ते म्हणाले, भाजपसोबत जावं हीच पक्ष हिताची भूमिका आहे. मला तुमच्याकडून आश्वासन हवं आहे. मला मंत्रिपद नाही  दिलं तरी चालेल. पण भाजपसोबत  सरकार बनवा. 


 विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतांची जुळवाजुळव केली ती पाहता एकनाथ शिंदे यांच्या दाव्यानुसार जर  40 शिवसेना आमदार  असतील तर सत्तेची गणित बसवणं भाजपासाठी कठीण जाणार नाही असं चित्र दिसत आहे. भाजपाचे  106 आमदार, एकनाथ शिंदेंना समर्थन करणारे 40 आणि अपक्ष अशी मोट बांधून भाजपा बहुमताचा  145 चा आकडा गाठू शकते.


एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसैनिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. मुंबईत शिवसेना भवनाबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक एकत्र आले होते. शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडखोरीविरोधात महिला शिवसैनिकांचा आक्रोशही पाहायला मिळाला. त्यावेळी एका महिला शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले होते.  


इतर महत्त्वाच्या बातम्या