मनमाड : आपल्या मुला-मुलींनी डॉक्टर, इंजिनीअर किंवा सरकारी अधिकारी बनून नाव कमवावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. मात्र वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रुपाली रौंदळ हिने चक्क कुस्तीपटू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली आहे.


नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील दुंधे या छोट्याशा गावातील रुपाली रौंदळ सध्या दहावीच्या वर्गात शिकते. रुपालीचे वडील चिंतामन रौंदळ यांना कुस्तीची आवड असल्याने त्यांनी कुस्तीपटू होण्याचा प्रयत्न केला. मात्र घरच्या परिस्थितीमुळे त्यांच स्वप्न अपूर्ण राहिले. त्यामुळे मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता त्यांनी मुलगी रुपाली हिला इयत्ता आठवीपासूनच कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली.




म्हारी छोरी किसी छोरेसे कम नही! हा डायलॉग दंगल चित्रपटात तुम्ही ऐकला आसेल. असाच काहीसा प्रकार दुंधे येथील शेतकरी कुटुंबातील चिंतामण रौंदळ यांच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. कधी काळी स्वत: कुस्तीपटू होऊन नाव कमवण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या चिंतामणी यांना घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे मोठा कुस्तीपटू होता आलं नाही. मात्र आपलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी मुलगा-मुलगी असा भेद न करता आपल्या मुलीला कुस्तीपटू बनवण्याचं ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं आहे.


चिंतामण रौंदळ रोज सकाळी उठून मुलीकडून व्यायम करुन घेतात. रोज शेजारीच असलेल्या डोंगरावर रनिंग करणे, योगासन, गळ्यात ट्रॅक्टरचे टायर टाकून ते ओढणे, दोरीउड्या मारणे असा सर्व प्रकारचा व्यायाम तिच्याकडून करुन घेत असतात. चिंतामण यांनी रुपालीला व्यायाम आणि कुस्तीच महत्व आठवीत असतानाच पटवून दिले. त्यामुळे रुपालीच्या मनात व्यायामाची आणि कुस्तीची आवड निर्माण झाली. घराजवळ बनवलेल्या आखाड्यात चिंतामण आपल्या मुलाला कु्स्तीचे धडे शिकवतात. या आखाड्यात उतरल्यावर मग बाप-लेकीची दंगल सुरु होऊन ते दोघ एकमेकांना चितपट करण्यासाठी भिडतात.



खरंतर चिंतामण रौंदळ यांना कुस्तीपटू बनून गावचं नाव मोठं करण्याची मोठी इच्छा होती. मात्र हालाखिच्या परिस्थितीमुळे त्यांना कुस्तीपटू होता आलं नाही. त्यामुळे त्यांचं स्वप्न पुर्ण होऊ शकले नाही. मात्र आपलं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी मुलीला प्रोत्साहन दिलं. आणि मग त्यासाठी आठवीपासूनच तिला व्यायामाचे आणि कुस्तीचे धडे त्यांनी द्यायला सुरुवात केली. मुलीवर कुठलही संकट आलं तरी ती खंबीर, सक्षम राहिली पाहिजे आणि ते कुस्तीच्या माध्यमातून होऊ शकते असं चिंतामण रौंदळ यांना वाटते. त्यामुळे रुपालीला कुस्तीपटू बनवण्याचा हेतू असून या माध्यमातून ती गावाचे, जिल्हा, राज्यच नव्हे तर देशाचं नाव मोठं करेल अशी चिंतामण यांना आशा आहे.




रुपाली हिने लहान वयातच गावाकडच्या यात्रांमध्ये कुस्तीला सुरुवात केली. मग तालुका नंतर जिल्हा पातळीवर कुस्ती खेळून यश मिळवलंय. इतकेच नव्हे तर कधी कधी तिला तिच्या वयोगटातील मुलांसोबत सुद्धा कुस्ती खेळावी लागलीय.


दंगल चित्रपटात ज्या पद्धतीने अमिर खान आपल्या धाकड गर्लबद्दल अभिमाने बोलतात, त्याच प्रमाणे चिंतामण रौंदळ यांनाही आपल्या मुलीबद्दल अभिमान आहे. एक दिवस ती नक्कीच आखाडा गाजवून देशाचे नाव रोषण करेल, असा विश्वास त्यांना आहे. रुपालीच्या कठोर मेहनतीमुळे ती नक्कीच एक दिवस देशाचं नाव मोठं करेल यासाठी तिला एबीपी माझाकडून शुभेच्छा.