जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर उपजिल्हा रुग्णालयाच्या शासकीय निवासस्थानात अनैतिक कृत्य करताना एका प्रेमीयुगुलाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (4 जून) घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे एका कंत्राटी वार्डबॉयला शासकीय निवासस्थान राहायला देण्यात आलं होतं. परंतु हा कर्मचारी बाहेरील स्त्री-पुरुषांना आपलं शासकीय निवासस्थान अनैतिक कृत्य करण्यासाठी वापरण्यास देत असल्याचं शेजाऱ्यांच्या निदर्शनास आलं होतं. काल संध्याकाळी पुन्हा असाच प्रकार लक्षात आल्यावर शेजारी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रेमीयुगुलास रंगेहाथ पकडलं. त्यानंतर पोलिसांना बोलावून प्रेमीयुगुल आणि संबंधित कर्मचाऱ्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
ही घटना भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजली असता ते पदाधिकारी रुग्णालयात दाखल झाले आणि प्रशासनाला याबाबत जाब विचारला. यावेळी संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचं जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आलं आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय सोनवणे यांनी दिली.
जळगावाचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर
दरम्यान जळगाव जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. मे महिन्यात परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली. जून महिन्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. परिणामी जळगावचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहोचला आहे.