Chhatrapati Sambhaji Nagar News: मागील काही दिवसात राज्यातील अनेक भागात हिंसाचाराच्या घटना पाहायला मिळाल्या. राम नवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) देखील मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडल्याचे  समोर आले होते. दरम्यान आता पुन्हा एकदा ग्रामीण भागात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचाराच्या घटना घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो असा इशाराच थेट पोलिसांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरात विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून रुजू झालेल्या डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण (Dr. Dnyaneshwar Chavan) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. 'दिव्य मराठी'ने हे वृत्त दिले आहेत.


आगामी काळातील वेगवेगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात जाती-धर्माच्या किंवा महापुरुषांचे पुतळे, झेंडे आदींच्या नावाखाली हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे अशा शक्यता लक्षात घेता ग्रामीण पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जाणार असल्याचं चव्हाण म्हणाले. तसेच या सर्व पार्श्वभूमीवर 4 जिल्ह्यांतील तालुके, गाव, वाड्या-वस्त्यांवर पोलिसांकडून सूक्ष्मपणे लक्ष ठेवण्यात येणार आहे. यापूर्वीच्या गुन्हेगारांसह सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या पोस्ट, संवादांवरही विशेष लक्ष असणार आहे, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.


पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, हेल्मेट सक्ती असण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने स्वतःची काळजी म्हणून ते परिधान करावे. सोनसाखळी चोरटे, घरफोडी व दुचाकी चोरट्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर विशेष लक्ष देऊन कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात ग्रामरक्षा दलांना अॅक्टिव्ह करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.


पोलिसांच्या दाव्याने खळबळ... 


जाणीवपूर्वक हिंसाचाराच्या घटना घडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यापूर्वी विरोधकांनी केला आहे. तर सत्ता गेल्याने विरोधकांकडून अशा घटना घडवल्या जात असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. अशात आता निवडणुकीच्या काळात हिंसाचाराच्या घटना घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो असा दावा पोलीस दलातील एका मोठ्या अधिकाऱ्याने केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे अशा हिंसाचाराच्या घटना कोणाला आणि का घडवून आणायच्या आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


पोलीस हालचालींवर लक्ष ठेवून...


राम नवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर किराडपुरा भागात हिंसाचाराची घटना समोर आली होती. दरम्यान या घटनेनंतर जिल्ह्यात अनेक छोट्या-मोठ्या वादाच्या घटना सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. तर पोलीस देखील सर्व परिस्थिती आणि हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. विशेष करून सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या लोकांवर थेट कारवाया करण्यात येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sanjay Raut On SIT : कुरुलकर प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत, संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप