CM Eknath Shinde in Chhatrapati Sambhaji Nagar : 'शासन आपल्या दारी' अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) कन्नड येथे आज (26 मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते शासकीय योजनांचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेतून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. किती आले किती गेले आणि कितीही आघाड्या झाल्या तरी एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना भारी असल्याचं शिंदे म्हणाले. 


यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, उद्या संसद भवनाचे उद्घाटन करायचे आहे. पण त्याला विरोध करण्यात येत आहे. संसद भवन पवित्र मंदिर आहे. तिथे सर्व खासदार जाऊन बसतात, जनतेचे प्रश्न मांडतात. हे तर ऐतिहासिक काम असून, याला काय विरोध करतात. याचा अर्थ ही पोटदुखी आहे. या कामाचे मोदींना श्रेय मिळेल म्हणून विरोधकांची पोटदुखी सुरु आहे. तर केजरीवाल मुंबईत येतात ते एकाला भेटतात, दुसऱ्याला भेटतात आणि दुसरे तिसऱ्याला तिसरे पाचव्याला भेटत आहेत. हे त्याच्या दारी आणि ते त्याच्या दारी जात आहेत. पण आपण कोणाच्या दारी जात नाही. त्यामुळे किती आले किती गेले आणि कितीही आघाड्या झाल्या तरी एकटे मोदी सर्वांना भारी असल्याचं शिंदे म्हणाले.


पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, माझे भाषण सुरु झाल्यावर लोकं उठून चालले असल्याचे काही लोकं दाखवत असतात. पण सकाळपासून येथे लोकं येऊन बसले आहेत. एकही जण येथून उठला नाही. ही गर्दी पैसे देऊन जमा केलेली नाही. त्यामुळे माध्यमांनी खरी परिस्थिती दाखवली पाहिजे. आम्ही घरी बसून सरकार चालवत नाही. आतापर्यंत लोकांना शासनाच्या दारावर जावे लागत होते. पण आता शासन लोकांच्या दारावर जात आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून 'शासन आपल्या दारी' योजना सुरु केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 हजार 457 कोटी रुपयांचं निधी या योजनेअंतर्गत वाटप होणार आहे. यात सर्वच विभागाच्या योजना आहे. सरकार स्थापन झाल्यापासून सर्वसामान्य लोकांचे निर्णय घेतले. प्रशासनाने देखील चांगली तयारी केली आहे. सरकार आल्यावर 28 सिंचन योजनांना सुप्रीमो दिला. किसान सन्मान योजनाप्रमाणे राज्य सरकराने नमो सन्मान योजना सुरु करून वर्षाला शेतकऱ्यांना 6  हजार देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिंदे म्हणाले. 


काही लोकं आपल्या देशांची बदनामी इतर देशात जाऊन करतायत...


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाठबळ आपल्या सरकारला आहे. आपल्या अनेक मागण्या त्यांनी मान्य केल्या. मराठवाडा वाटर ग्रीड योजनेसाठी देखील आम्ही मोदी यांच्याकडे मागणी करणार आहे. यासाठी ते नक्कीच मदत केल्याशिवाय राहणार नाहीत. महत्वाच्या निर्णयासाठी केंद्राचा पाठींबा पाहिजे. जगात अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना, आपल्या देशांची अर्थव्यवस्था 11 नंबरवरून 5 नंबरवर आली आहे. पण काही लोकं आपल्या देशांची बदनामी इतर देशात जाऊन करत आहे. ऑस्ट्रोलियाचे पंतप्रधान आपल्या प्रधानमंत्र्यासमोर नतमस्तक झाले. तर काँग्रेसने जनतेला गरीब करण्याचे काम केले असल्याचे देखील शिंदे म्हणाले.


CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज छत्रपती संभाजीनगर दौरा; ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी